चांगला प्रतिसाद मिळालेल्या नव्या अर्टिगा या बहुपयोगी वाहनासह सुमारे १,४९२ प्रवासी मोटारी माघारी बोलावण्याची वेळ मारुती सुझुकीवर आली आहे. वाहनाचे स्टेअरिंग व्हील असलेल्या भागात दोष आढळल्याने देशातील सर्वात आघाडीच्या या कंपनीने गेल्याच महिन्यात तयार करण्यात आलेली वाहने माघारी घेतली आहेत.
माघारी घेण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये अर्टिगा (३०६), स्विफ्ट (५९२), डिझायर (५८१) आणि ए-स्टार (१३) या वाहनांचा समावेश आहे. कंपनीच्या उत्तर भारतातील प्रकल्पांमध्ये १९ ते २६ ऑक्टोबर या दरम्यान या मोटारी तयार झाल्या आहेत. विक्रेत्यांमार्फत त्या जमा करून त्यात मोफत दुरुस्ती केली जाईल, असे कंपनीने याबाबतच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. ए-स्टार हे वाहन तर कंपनीने चार वर्षांपूर्वीही माघारी घेतले होते. इंधन टाकीत दोष आढळल्याने फेब्रुवारी २०१० मध्ये सर्वात मोठी वाहने माघार घेताना कंपनीने एक लाख ए-स्टार कार परत बोलाविल्या होत्या.