काळ्याचे पांढरे करण्याचा दोषारोप असलेल्या आणि सध्या चौकशी सुरू असलेल्या खासगी क्षेत्रातील तीन बडय़ा बँकांना गुरुवारी रिझव्‍‌र्ह बँकेकडून अप्रत्यक्षपणे दोषमुक्तता मिळाली. अशा प्रकारचा एकही व्यवहार घडल्याचे दिसून येत नाही आणि देशाच्या बँकिंग प्रणालीत काळ्या पैशाचा ओघ रोखणारी व्यवस्था चोख असल्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले.
गरज नसताना आपणच आपल्या व्यवस्थेला अवनत का करावे? असा सवाल रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी दिल्लीतील गेल्या आठवडय़ातील ‘कोब्रापोस्ट’च्या स्टिंग ऑपरेशनविषयी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना केला. ‘आपल्या व्यवस्थेत कोणताही दोष नाही आणि काळ्या पैशाच्या प्रतिबंधासाठी तिने चोख बंदोबस्त केला आहे,’ असे चक्रवर्ती यांनी प्रतिपादन केले.
आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अ‍ॅक्सिस बँक या खासगी क्षेत्रातील तीन बडय़ा खासगी बँकांमध्ये काळ्या पैशाला पांढरे करणाऱ्या उलाढाली सुरू असल्याची भांडाफोड ‘कोब्रापोस्ट’ या पोर्टलने स्टिंग ऑपरेशनद्वारे केली. त्यावर भाष्य करताना चक्रवर्ती म्हणाले, ‘हे आरोप म्हणजे नियमांचे उल्लंघन म्हणता येणार नाही. (आरोपातील दाव्याप्रमाणे) एकही उलाढाल घडलेली नाही. ‘केवायसी’विषयक हयगय ही कोणत्याही व्यवस्थेत घडू शकते. हा एकूण मुद्दा हा व्यवहारिक स्वरूपाचा असून, काळ्या पैशाला सन्मार्ग मिळवून देण्याशी त्याचा काहीही संबंध नाही.’ लक्षणीय म्हणजे खुद्द रिझव्‍‌र्ह बँक, केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि संबंधित बँकाही या भांडाफोड प्रकरणाची दखल घेऊन आरोपांची चौकशी करीत असताना, रिझव्‍‌र्ह बँकेचे सध्याचे सर्वात ज्येष्ठ डेप्युटी गव्हर्नर मात्र याला घोटाळाच म्हणता येत नसल्याचे सांगत आहेत. काळ्या पैशाला रोखणाऱ्या सद्य व्यवस्थेला अधिक कणखर बनविण्याची गरज भासल्यास रिझव्‍‌र्ह बँकेकडून जरूर ती पावले टाकली जातील, असे स्पष्टीकरणही त्यांनी केली.
नवी दिल्लीत १४ मार्च रोजी झालेल्या या गौप्यस्फोटानंतर, तिन्ही बँकांनी संबंधित कर्मचाऱ्यांचे ताबडतोब निलंबन केले असून, रिझव्‍‌र्ह बँकेने या तीन खासगी बँकांकडून ‘ग्राहकांची शहानिशा(केवायसी)’ नियमांच्या उल्लंघनाबाबत चौकशी सुरू असून, येत्या ३१ मार्चपर्यंत त्या संबंधाने अहवाल मिळवून योग्य तीन कारवाई केली जाणे अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या ठिकाणी बेकायदा म्हणता येतील अशा उलाढालीच जर घडलेल्या नाहीत, तर त्याला घोटाळाही म्हणता येणार नाही.
– के. सी. चक्रवर्ती.

पुन्हा हवाई प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी आवश्यक असा कोणताही पुनर्आढावा गेल्या अनेक महिन्यांपासूून ठप्प असलेल्या किंगफिशरने अद्याप हवाई विभाग महासंचालकांकडे सादर केलेला नाही.
– अजित सिंह
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री

ज्या ठिकाणी बेकायदा म्हणता येतील अशा उलाढालीच जर घडलेल्या नाहीत, तर त्याला घोटाळाही म्हणता येणार नाही.
– के. सी. चक्रवर्ती.

पुन्हा हवाई प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी आवश्यक असा कोणताही पुनर्आढावा गेल्या अनेक महिन्यांपासूून ठप्प असलेल्या किंगफिशरने अद्याप हवाई विभाग महासंचालकांकडे सादर केलेला नाही.
– अजित सिंह
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री