देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून येत्या १० वर्षांत शेअर बाजारात तब्बल ३०० अब्ज अमेरिकी डॉलरवर (साधारण १९ लाख कोटी रुपये) गुंतवणूक जाणे अपेक्षित आहे, असा जागतिक दलाली संस्था मॉर्गन स्टॅन्लेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाचा कयास आहे.
गुंतवणूकदारांना अनुकूल नियमन, जनसांख्यिकीय पूरकता, गुंतवणूकदारांमध्ये वाढलेली जागरूकता आणि गुंतवणुकीसाठी जोखीम उचलण्याचा वाढता कल आणि वातावरणातील गुणात्मक बदलाने समभागातील गुंतवणुकीसाठी निर्माण केलेली अनुरूपता वगैरे घटक येत्या काळात भांडवली बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढविण्यास पूरक ठरतील, असे या अहवालाने म्हटले आहे. भारतीय कंपन्यांच्या समभागांना जनमानसातून वाढती मागणी मिळण्यासाठी आवश्यक नेपथ्यरचना तयार झाली असल्याचे या अहवालाने निष्कर्षांप्रत म्हटले आहे.
या परिणामी आगामी १० वर्षांत देशांतर्गत गुंतवणुकीचा बाजारातील ओघ हा ३०० अब्ज डॉलरवर जाण्याचा मॉर्गन स्टॅन्लेचा अंदाज आहे. यापूर्वीच्या १० वर्षांत बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून आलेल्या ५० अब्ज डॉलरच्या तुलनेत हा ओघ पुढील दशकभरात सहा पटीने वाढण्याचा तिचा अंदाज आहे. गत १० वर्षांत विदेशी वित्त संस्थांकडून बाजारात १३४ अब्ज डॉलरची नक्त गुंतवणूक आली आहे.
आजच्या घडीला देशांतर्गत गुंतवणूकदाराची शेअर बाजारातील गुंतवणूक बव्हंशी दुर्लक्षित राहिली आहे. थेट समभागांमध्ये आणि म्युच्युअल फंडांमार्फत गुंतवणूक जरूर आहे. पण त्यापेक्षा तिपटीहून अधिक गुंतवणूक ही बँकांतील मुदत ठेवींमध्ये आहे. शिवाय सोन्यातील गुंतवणूकही खूपच लक्षणीय आहे.
आगामी काळात मात्र सामान्यांच्या गुंतवणुका सोने-बँक ठेवींकडून समभागांकडे वळणे अहवालाला अपेक्षित आहे.
म्युच्युअल फंडांना त्यांच्याकडील एकूण गुंतवणूकयोग्य गंगाजळीपैकी ०.२ टक्के गुंतवणूकदारांच्या शिक्षण व जागरणासाठी खर्च करण्याची सक्ती ‘सेबी’ने केली आहे. यातून नजीकच्या काळात गुंतवणूकदार शिक्षणावर दरसाल सुमारे ४,५०० कोटी रुपये खर्च केले जातील, असे मॉर्गन स्टॅन्लेने गणित मांडले आहे. ही बाब समभागातील गुंतवणुकीला बळ देणारीच ठरेल, असे तिने स्पष्ट केले आहे.
तथापि, समभाग मूल्यात मोठी घसरण, करविषयक कायद्यांमध्ये प्रतिकूल फेरबदल, निरंतर नकारार्थी परतावा आणि पर्यायाने गुंतवणुकीतून अपेक्षित आर्थिक उद्दिष्ट गाठता न आल्यास शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल सामान्य गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंगही होऊ शकेल, असा इशाराही अहवालाने दिला आहे.
राज्यात १,५०० कोटींची गुंतवणूक व विस्तार
पुणे : थ्रीजी व टुजीसाठीचे नेटवर्क तसेच रिटेल विस्तारावर भर देतानाच सुमारे १,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे, अशा शब्दात गेल्या आर्थिक वर्षांच्या वित्तीय व व्यावसायिक कामगिरीतील महाराष्ट्र परिमंडळाचा प्रवास व्होडाफोन कंपनीने नोंदविला.
ग्राहकसंख्येत व्होडाफोन ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी आहे. कंपनीच्या महाराष्ट्र व गोवा या एकत्रित परिमंडळाच्या कामगिरीबाबत या विभागाचे व्यवसाय प्रमुख आशिष चंद्रा यांनी येथे सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने या भागात नव्या ३,००० थ्रीजी व टुजीचे संपर्क (साईट) वाढविले आहेत. ही संख्या आता ५,००० हून अधिक झाली आहे. त्यासाठीची या कालावधीतील एकूण गुंतवणूकही १,५०० कोटी रुपये झाली आहे. मुंबई वगळता दोन राज्यांचा समावेश असलेल्या या परिमंडळात कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत नवे १९ लाख ग्राहक जोडल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा