गेल्या सलग सहा व्यवहारातील भांडवली बाजारातील तेजीला गुरुवारी अखेर पायबंद बसला. असे करताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी त्याच्या ७,५०० या उल्लेखनीय टप्प्यापासून माघारी फिरला. प्रमुख निर्देशांकात नफेखोरीपोटी जवळपास ५० अंशांची घसरण झाली. तर १७०.६२ अंश घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४,६२३.३४ या कसा बसा २४,५०० च्या वरच्या स्तरावर राहिला.
गेल्या सहाही व्यवहारातील तेजीमुळे सेन्सेक्समधील एकूण वाढ १,७९२ अंशांची राहिली आहे. ऑक्टोबर २०१५ नंतर प्रथमच एवढा मोठा निर्देशांक वाढीचा टप्पा बाजाराने नोंदविला आहे. डॉलरच्या तुलनेत भक्कम होत जाणारा रुपया आणि युरोपीय मध्यवर्ती बँकेकडून जाहीर होणारे अर्थसाहाय्य याच्या आशेवर बाजारात गुंतवणूकदारांनी नफेखोरी अनुभवली.
सेन्सेक्समधील ३० पैकी १९ समभागांचे मूल्य घसरले. त्यात भेल, रिलायन्स, इन्फोसिस, गेल, एल अ‍ॅण्ड टी, स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, डॉ. रेड्डीज, महिंद्र, हीरो मोटोकॉर्प यांचा समावेश राहिला. माहिती तंत्रज्ञान निर्देशांक १.३३ टक्क्यांसह घसरणीत क्षेत्रीय निर्देशांकात आघाडीवर राहिला.

Story img Loader