मुंबई: जागतिक बाजारातील सकारात्मकता आणि निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात वाढ झाल्याने मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात देशांतर्गत बाजारात चैतन्याचे वातावरण कायम आहे. युरोपीय आणि अमेरिकी शेअर बाजारातील तेजीचे प्रतिबिंब देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५४९.६२ अंशांनी म्हणजेच ०.९४ टक्क्यांनी वधारून ५८,९६०.६० पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, तो ७३२.६८.अंशांनी वधारून ५९,१४३.६६ या सत्रातील उच्चांकी पातळीपर्यंत झेपावला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १७५.१५ अंशांची वाढ झाली आणि तो १.०१ टक्क्यांनी वाढून १७,४८६.९५ पातळीवर स्थिरावला.

हेही वाचा >>> “आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका!

अनुकूल जागतिक आणि देशांतर्गत संकेतांमुळे भारतीय भांडवली बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या नरमलेल्या किमती आणि दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या दमदार आर्थिक कामगिरीमुळे देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण कायम आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, सप्टेंबरमध्ये चलनवाढीचा दर शिगेला पोहोचला आहे. मात्र यापुढील काळात महागाईचा दर कमी होईल असा विश्वास मध्यवर्ती बँकेने व्यक्त केल्याने बाजारात सकारात्मकता कायम आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.

हेही वाचा >>> तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे जातो? पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल; म्हणाल्या, “पुण्याची सत्ता…”

सेन्सेक्समध्ये आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी स्टेट बँकेचा समभाग आघाडीवर राहिला. त्यापाठोपाठ आयटीसी, नेस्ले, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, मिहद्र अँड मिहद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि लार्सन अँड टुब्रो यांचे समभाग तेजीत होते. दुसरीकडे एचडीएफसी, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, टेक मिहद्र आणि सन फार्माच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराकडून उपलब्ध माहितीनुसार, सोमवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३७२.०३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. शुक्रवारच्या तेजीच्या बाजारातही परदेशी गुंतवणूकदार विक्रेत्यांच्या भूमिकेतच होते.

Story img Loader