मुंबई : भांडवली बाजारात सलग पाचव्या सत्रात तेजीवाल्यांचा जोर कायम असून गुरुवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने आणखी ९३ अंशांची भर घातली. दिवसभरातील अस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणूकदारांनी निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग खरेदी केल्याने निर्देशांक सकारात्मक पातळीवर स्थिरावले.
गुरुवारी सत्रारंभ घसरणीपासून झाला आणि उत्तरार्धात खरेदी उत्साहाने निर्देशांकांनी उसळी घेतली. दिवसअखेरीस, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९५.७१ अंशांनी वधारून ५९,२०२.९० पातळीवर स्थिरावला. सत्रादरम्यान त्याने ५९,२७३.८५ अंशांची उच्चांकी तर ५८,७९१.२८ अंशांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ५१.७० अंशांची वाढ झाली आणि तो १७ ,५६३.९५ पातळीवर स्थिरावला.
अमेरिकी रोखे बाजारातील वाढता परताव्याचा दर, जागतिक भांडवली बाजारातील घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपयातील अनपेक्षित मोठी पडझड यामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा वाढला होता. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हकडून आगामी दोन पत धोरणांमध्ये व्याजदरात ७५ आधारिबदूंची (प्रत्येकी पाऊण टक्क्यांची) वाढ अपेक्षित आहे. तर चालू वर्षांच्या अखेरीस ‘फेड’दर ४.५० ते ४.७५ टक्क्यापर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. याच्या नकारात्मक प्रभावाने सत्रारंभी बाजारात घसरण दिसून आली.
बाजार निर्देशांकातील तेजीच्या मालिकेने आशादायी वातावरण आहे. देशांतर्गत आघाडीवर महागाई दराने शिखर गाठले असून, येथून पुढील काळ हा उताराचाच असेल. परिणामी, रिझव्र्ह बँकेकडून डिसेंबरमध्ये होणाऱ्या आगामी पतधोरणात आढाव्याच्या बैठकीत कठोर पवित्रा काहीसा नरमण्याची आशा आहे. मात्र अमेरिकेतील रोख्यांच्या उच्च परतावा दरामुळे परदेशातून येणारा निधीचा ओघ अस्थिर राहण्याचा अंदाज आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.