अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या पतधोरणावर आता तेजीची मदार
मुंबई : गेल्या चार सलग सत्रांपासून तेजीच्या लाटेवर स्वार दिवसागणिक विक्रमाचे नवे शिखर गाठणाऱ्या भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये बुधवारी खंड पाडला. अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या लवकरच जाहीर होणाऱ्या व्याजदराबाबतच्या पतधोरण निर्णयाबाबत काहीशी साशंकता व्यक्त करत गुंतवणूकदारांनी समभाग विक्री केली.
परिणामी, सत्राच्या आरंभीला तेजीत असलेले सेन्सेक्स व निफ्टी व्यवहाराखेर मात्र घसरले. दोन्ही निर्देशांकांतील जवळपास अध्र्या टक्क्य़ाहून अधिकच्या घसरणीमुळे सेन्सेक्स व निफ्टी त्यांच्या विक्रमापासूनही फारकत घेणारे ठरेल.
व्यवहारात ५२,७७३.०५ वर असलेला मुंबई निर्देशांक सत्रअखेर मंगळवारच्या तुलनेत २७१.०७ अंश घसरणीने ५२,५०१.९८ वर येऊन ठेपला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०१.७० अंश घसरणीसह १५,७६७.५५ पर्यंत स्थिरावला.
सेन्सेक्समध्ये पॉवरग्रिडचे मूल्य सर्वाधिक, २ टक्क्य़ांनी घसरले. त्याचबरोबर इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्सही घसरले. तर नेस्ले इंडिया, एनटीपीसी, ओएनजीसी, इन्फोसिस आदी वाढले.
अदानी समभागांवर विक्रीदबाव कायम
भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांबरोबरच अदानी समूहातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग मूल्यही बुधवारी घसरले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या गोठवलेल्या निधीबाबत स्पष्टीकरण येऊनही अदानी उद्योग संबंधित उपकंपन्यांचे समभाग मूल्य एकेरी अंक टक्केवारीत घसरले. यामध्ये अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झेन, अदानी एंटरप्राइजेस, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर आदी ५ टक्क्य़ांपर्यंत खाली आले. तर अदानी ग्रीन एनर्जी ३ टक्क्य़ांनी घसरला. मंगळवारप्रमाणेच तीन उपकंपन्यांनी बुधवारीही त्यांचा किमान स्तर अनुभवला.