मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात सकारात्मक कल गुरुवारीही कायम राखत सलग पाचव्या सत्रात चांगल्या कामगिरीसह सांगता झाली. जागतिक स्तरावर भांडवली बाजारातून मिळणारे सकारात्मक संकेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमतीतील घसरण आणि देशांतर्गत भांडवली बाजारात विदेशी गुंतवणूकदारांच्या पुनरागमनाने सेन्सेक्सने गुरुवारच्या सत्रात २८४ अंशांची कमाई केली आहे.
सुरुवात घसरणीसह होऊनही दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स २८४.४२ अंशांनी वधारून ५५,६८१.९५ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ३४०.९६ अंशांनी झेप घेत ५५,७३८.४९ या उच्चांकी पातळीपर्यंत मजल मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- निफ्टीने ८४.४० अंशांची भर घालत तो १६,६०५.२५ अंशांच्या पातळीवर बंद झाला.
जागतिक पातळीवरील प्रमुख देशांच्या भांडवली बाजारात झालेल्या घसरणीकडे भारतीय बाजाराने दुर्लक्ष केले.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने खरेदीचा जोर कायम राहिला. युरोपीय मध्यवर्ती बँकेने (ईसीबी) थेट अर्ध्या टक्क्यांची व्याज दरवाढ केली आहे. २०११ नंतर ११ वर्षांनी प्रथमच झालेली ही दरवाढ आहे. तसेच अमेरिकी मध्यवर्ती बँकेकडून देखील पाऊण टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. भांडवली बाजारावर संभाव्य व्याज दरवाढीचा परिणाम आधी होऊन गेला असला तरी आगामी काळात महागाई आणि अर्थव्यवस्थेच्या वाटचालीवरूनच बाजाराची दिशा निश्चित होईल, असे मत जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचा समभाग आघाडीवर होता. बँकेने जूनअखेर सरलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ६०.५ टक्क्यांची वाढ नोंदवल्यानंतर इंडसइंड बँकेच्या समभागाने ७.८८ टक्क्यांची उसळी घेतली होती.
त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, बजाज फिनसव्र्ह, एशियन पेंट्स, टेक मिहद्र, लार्सन अँड टुब्रो, अॅक्सिस बँक आणि पॉवर ग्रीडच्या समभागात सर्वाधिक तेजी होती. दुसरीकडे डॉ रेड्डीज लॅब, कोटक बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि एनटीपीसीच्या समभागात घसरण नोंदवली गेली.
रुपया २० पैशांनी सावरला
आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा रुपयाला झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारच्या सत्रात २० पैशांनी सावरत ७९.८५ पातळीवर स्थिरावला. देशांतर्गत भांडवली बाजारात देखील तेजीचा कल असून निर्देशांकांनी सलग पाचव्या सत्रात घोडदौड कायम राखल्याने रुपयाला बळ मिळाले आहे. परकीय चलन विनिमय मंचावर रुपयाची ८०.०३ पासून व्यवहाराला सुरुवात झाली. पुढील सत्रात त्याने ८०.०६ रुपयांची नीचांकी पातळी गाठली. मात्र नंतर तोटा भरून काढत तो ७९.८५ पातळीवर बंद झाला. बुधवारच्या सत्रात रुपया ८०.०५ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर स्थिरावला होता.