मुंबई : जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेत आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार देशांतर्गत भांडवली बाजारात पुन्हा सक्रिय झाल्याने सलग चौथ्या सत्रात प्रमुख निर्देशांकांनी तेजीची दौड कायम राखली. भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने ५८ हजारांची पातळीही पुन्हा काबीज केली. निर्देशांकात सर्वाधिक योगदान असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने सेन्सेक्सला अधिक बळ दिले.
परिणामी, सोमवारच्या सत्रात सेन्सेक्स ५४५.२५ अंशांची उसळी घेत पुन्हा ५८,००० पातळीवर परतला. दिवसअखेर तो ५८,११५.५० पातळीवर स्थिरावला. निफ्टीनेदेखील १८१.८० अंशांची कमाई केली आणि तो १७,३४०.०५ पातळीवर पोहोचला.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफपीआय) पुन्हा भांडवली बाजारात सक्रिय झाले आहेत. सलग नऊ महिन्यांच्या समभाग विक्रीच्या माऱ्यानंतर जुलै महिन्यात ५,००० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.
युरोपात कमी झालेला बेरोजगारीचा दर, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि जागतिक स्तरावर वाढलेला आशावाद यामुळे बाजारात चैतन्य निर्माण झाले. दुसरीकडे देशांतर्गत आघाडीवर वाहन निर्माता कंपन्यांनी जुलै महिन्यात चांगली कामगिरी केल्याने वाहन कंपन्यांचे समभाग तेजीत होते, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
रुपयाला २२ पैशांचे बळ
चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने सोमवारच्या सत्रात दमदार कामगिरी केली. भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकांनी गेल्या चार सत्रांत दर्शविलेली तेजी आणि प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्याने रुपया वधारला. डॉलरसमोर रुपया २२ पैशांनी वधारून ७९.०२ प्रति डॉलर पातळीवर स्थिरावला. स्थानिक चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७९.१६ या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. रुपयाने दिवसभरातील सत्रात ७९.०० रुपयांची उच्चांकी तर ७९.२२ रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती.