मुंबई : जागतिक मंदीसंबंधी चिंता गहिरी बनल्यामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात माहिती-तंत्रज्ञान आणि औषधी निर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला. परिणामी सकाळच्या सत्रात सकारात्मक पातळीवर असलेल्या भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी दिवसाच्या उत्तरार्धात नकारात्मक वळण घेत मोठय़ा घसरणीसह बंद झाले.

हेही वाचा >>> “हे रात्री बावचळून उठतात, खोकं..”, अजित पवारांची एकनाथ शिंदे गटावर टोलेबाजी!

भांडवली वस्तू आणि वाहन निर्मिती कंपन्यांच्या समभागांमध्ये आलेल्या तेजीच्या जोरावर गुरुवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने सकारात्मक सुरुवात करत ६०,६७६.१२ या दिवसभरातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. मात्र सरतेशेवटी तो ४१२.९६ अंश म्हणजेच ०.६८ टक्क्यांच्या घसरणीसह ५९,९३४.०१ पातळीवर बंद झाला.

दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने बुधवारच्या सत्रात १८,००० अंशांची राखलेली पातळी मोडली. या निर्देशांकांत १२६.३५ अंशांची घसरण झाली आणि तो ०.७ टक्क्यांनी घसरून १७,८७७.४० वर स्थिरावला.

जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या विपरीत देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. जागतिक मंदीच्या धसक्याने माहिती-तंत्रज्ञान आणि औषधी निर्माण कंपन्यांच्या समभागात पडझड झाली. दुसरीकडे व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांनी बाजाराला संभाव्य मोठय़ा पडझडीतून सावरण्यास मदत केली.

अमेरिकेत महागाईचा दर अपेक्षेपेक्षा अधिक राहिल्याने तेथील मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदरात मोठी वाढ अपेक्षित आहे. परिणामी अमेरिकेसह जगभरातील गुंतवणूकदार सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.

एफआयआयकडून विक्रीचा मारा

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारच्या सत्रात देशांतर्गत भांडवली बाजारात १,३९७.५१ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. विद्यमान सप्टेंबर महिन्यात एफआयआयने देशांतर्गत भांडवली बाजारात आतापर्यंत ५,००० कोटींहून अधिक मूल्याच्या समभागांची खरेदी केली आहे.

Story img Loader