मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांकडून आलेला गुंतवणुकीचा ओघ आणि सकारात्मक जागतिक संकेतामुळे चार सत्रातील घसरणीला लगाम बसला. भांडवली बाजारातील प्रमुख सेन्सेक्स शुक्रवारी ३४४ अंशांची उसळी घेतली. तर निफ्टीने पुन्हा एकदा १६,००० पातळीच्या वर मजल मारली आहे. ग्राहकोपयोगी वस्तू आणि वाहन निर्माता कंपन्यांच्या समभागात खरेदीची लाट आल्याने निर्देशांकांना बळ  मिळाले.

सप्ताहअखेरच्या व्यवहारात, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३४४.६५ अंशांची वाढ होऊन तो ५३,७६०.७८ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये शुक्रवारच्या सत्रात देखील मोठे चढ-उतार सुरू होते. निर्देशांकाने दिवसभरातील सत्रात ५३,३६१.६२ अंशांचा तळ गाठला होता, तर ५३,८११.३७ उच्चांकी पातळीला त्याने स्पर्श केला होता.

नक्की वाचा >> …म्हणून एलॉन मस्क स्वत:च्या वडिलांशी बोलत नाही; एरोल मस्क यांच्याकडून धक्कादायक माहिती उघड

सेन्सेक्समध्ये हिंदूस्तान युनिलिव्हर, टायटन, मारुती, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी, मिहद्र अँड मिहद्र, नेस्ले आणि भारती एअरटेलचे समभाग तेजीसह विसावले. तर दुसरीकडे टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो, डॉ रेड्डीज आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या समभागात घसरण झाली.

फेडच्या निर्णयाकडे लक्ष

अमेरिकेत महागाईने विक्रमी उच्चांक गाठल्याने अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हकडून (फेड) व्याजदरात मोठी वाढ शक्य आहे. त्यामुळे फेडरल रिझव्‍‌र्हच्या घोषणेकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा कमी करून खरेदीला प्राधान्य दिल्याने बाजारात आशादायी वातावरण निर्माण झाले आहे. मात्र माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची निराशाजनक तिमाही कामगिरी, डॉलरच्या तुलनेत घसरता रुपया आणि जागतिक महामंदीच्या भीतीने बाजाराची वाढ रोखून धरली आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले. चलनवाढीला नियंत्रित करण्याच्या दिशेने मध्यवर्ती बँकेची विश्वासार्हता राखण्याला ‘फेड’ने दिलेले महत्त्व पाहता, तिच्याकडून या बैठकीत पुन्हा अर्धा ते पाऊण टक्क्यांची व्याजदर वाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader