उद्योगक्षेत्राकडून होणाऱ्या सततच्या व्याजदर कपातीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शनिवारी भारतीय उद्योगक्षेत्राचे कान टोचले. भारतीय उद्योजकांनी ‘जुगाड’ करण्याची मनोवृत्ती सोडून द्यावी. एखाद्या समस्येवर कोणत्याही मार्गाने उपाय काढायचाच किंवा परिस्थिती सोपी करणाऱ्या निर्णयांसाठी संबंधितांवर दबाव आणणे उद्योगक्षेत्राने टाळले पाहिजे. त्याऐवजी आपण शाश्वत विकासाचे नवे मार्ग शोधण्यावर आणि त्यासाठीच्या संस्थांची निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी नियोजित योजनेवर ठाम राहण्याची शिस्त भारतीय उद्योगक्षेत्राने स्वत:च्या अंगी बाणवून घेतली पाहिजे, असे राजन यांनी सांगितले. ते शनिवारी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या सी.के.प्रल्हाद स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते. दीर्घकालीन आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर वाटचाल करताना कोणत्याही प्रकारचा ‘जुगाड’ करण्याची गरज नसते. त्यामुळे आपल्याला उद्योगांकडून उतावीळपणा आणि दबावाची नव्हे तर, परस्परांना समजून घेण्याची आणि सहकार्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. शाश्वत किंवा चांगल्या दर्जाचा विकास साधायचा असेल तर सोपे मार्ग शोधण्याची किंवा टाळाटाळ करण्याची मनोवृत्ती उपयोगाची नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सध्याच्या घडीला बाजारपेठेत उद्भवलेल्या समस्यांसाठी पुन्हा एकदा विकास साधण्याचा उतावीळपणा कारणीभूत आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जुन्या आणि निरूपयोगी पद्धतींचा अवलंब केल्यामुळे हे सगळे घडले आहे. त्यामुळे उद्योगक्षेत्राने संयम बाळगावा असे आवाहनही राजन यांनी यावेळी केले. गेल्या काही दिवसांत सरकार आणि भारतीय उद्योगक्षेत्राकडून वारंवार व्याजाचे दर कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर सातत्याने दबाव आणला जात आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतही देशातील आघाडीच्या उद्योजकांनी व्याजदर कपातीची मागणी उचलून धरली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा