झपाटय़ाने वाढत चाललेल्या शहरीकरणात अतंर्गत वाहतूक व्यवस्था आणि त्यातही उड्डाणपूल, भूमिगत मार्ग, पादचारी पूल, मेट्रो तसेच मोनो रेल्वे पूल आणि स्कायवॉक या गोष्टी अविभाज्य भाग बनल्या आहेत. मुंबईसह देशाच्या अन्य शहरांमध्ये या संबंधीच्या घडामोडींचा साद्यंत आढावा घेणाऱ्या दोन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषदेचे या निमित्ताने आयोजन करण्यात आले आहे. इंडियन इन्स्टिटय़ूशन ऑफ ब्रिज इंजिनीयर्स या संस्थेच्या वतीने आयोजित या परिषदेचे संस्थेच्या महालक्ष्मी येथील सभागृहात शनिवारी २४ नोव्हेंबरला सकाळी ९.३० वाजता इंजिनीयरिंग रेल्वे बोर्डचे सदस्य आणि भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचे माजी अधिकारी ए. पी. मिश्रा यांच्या हस्ते होत आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे पुल, पुलांची रचना आदी विषयांवर वेगवेगळे सात सत्र या दोन दिवसांच्या परिषदेत योजण्यात आले आहेत. जगभरातील नामांकित पुलांना गवसणी घालणाऱ्या विषयांचे माहितीपूर्ण ज्ञान या निमित्ताने मिळणार आहे, असे इंडियन इन्स्टिटय़ूशन ऑफ ब्रिज इंजिनीयर्सचे संस्थापक आणि महासंचालक माधव भिडे यांनी परिषदेसंबंधी माहिती देताना सांगितले. परिषदेनिमित्ताने मुंबईत होत असलेला मेट्रो रेल्वे प्रकल्प, तर दिल्लीत साकारलेला मेट्रो प्रकल्प यावर खास प्रबंध तयार करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे मुंबईतील प्रस्तावित ओव्हल मैदान ते विरार असा २१ हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्पावर पश्चिम रेल्वेच्या बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद सिंघल हेही प्रबंध सादर करणार आहेत, असे भिडे यांनी स्पष्ट केले.