डॉलरच्या तुलनेत गेल्या अनेक सत्रांपासून गटांगळी खाणाऱ्या भारतीय रुपयाने बुधवारी अखेर साठीला गाठलेच. एकाच सत्रात १०६ पैशांनी घसरत स्थानिक चलन ६०.७२ पर्यंत रोडावले. केवळ जून महिन्यात वरून रुपया ५६.५० वरून तब्बल ७ टक्क्यांनी रोडावून प्रति डॉलर ६०.७२ या रुपयाची ऐतिहासिक नीचांक पातळीवर अवनत झाला आहे.
गेल्या अनेक सत्रांपासून स्थानिक चलन ६० च्या आसपास फिरकत होते. चलन बाजारात त्याने दुपारीच ६०.७४ पर्यंत ऐतिहासिक गटांगळी घेतली. रुपयाचा ऐतिहासिक घसरणीचा प्रवास दिवसभर कायम राहूनही रिझव्र्ह बँकेमार्फत बुधवारी डॉलर खुले करणारा हस्तक्षेप झाला नसल्याचे समजते. एरव्ही चलन अस्थिरतेत रिझव्र्ह बँकेकडून हा उपाय आजमावला जातो.
अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्ह बेन बर्नान्के यांच्या संकेतांच्या परिणामी विदेशी गुंतवणूकदारांचा शेअर व रोखे बाजारात गुंतलेला डॉलर पुन्हा माघारी परतू लागला आहे. भांडवली बाजारातील गुंतवणूक काढून घेण्यासाठी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची डॉलरची गरज गेल्या अनेक दिवसांपासून विस्तारत आहे. शिवाय महिनाअखेर असल्याने तेल आयातदारांना त्यांनी विकत घेतलेल्या तेलाची सौदापूर्ती करणे भाग असल्याने डॉलरच्या तुलनेत रुपयावरील कमालीच्या वाढलेल्या दबावाचा परिणाम म्हणून साठीपल्याड रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीकडे पाहता येईल.
स्थानिक चलनाच्या तुलनेत अमेरिकी डॉलरचे भक्कम होणे केवळ भारतापुरतेच मर्यादित नसून अनेक विकसनशील देशात हे घडत आहे. अमेरिकेत काल डॉलर निर्देशांक जवळपास चार वर्षांच्या उच्चांकावर होता. रुपयाची आजची घसरण १.७८ टक्क्यांची होती. याच महिन्यात १० जूनला स्थानिक चलनात आतापर्यंतची सर्वाधिक १.९१ टक्क्यांची (१०९ पैसे) आपटी नोंदविली गेली होती.
* मार्च २०१४ पर्यंत रुपया ६२ पर्यंत : स्टॅन्डर्ड चार्टर्ड
भारतीय चलनातील घसरण अशीच कायम राहणार असून मार्च २०१४ पर्यंत रुपया डॉलरच्या तुलनेत ६२ पर्यंत रोडावेल, अशी भीती स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँकेने व्यक्त केली आहे. संथ आर्थिक सुधारणा, वाढणारी वित्तीय तूट, वित्तीय शिस्तीचा अभाव तसेच संभाव्य इंधन वायू दर असे देशाच्या अर्थव्यवस्थेचे वातावरण चलन अवमूल्यनाला जबाबदार धरले आहे. डिसेंबर २०१३ पर्यंत ६१ तर मार्च २०१४ पर्यंत रुपया ६२ पर्यंत घसरलेला असेल. तेलाच्या घटलेल्या किंमती व सोने आयातीवरील र्निबध यामुळे जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत विदेशी व्यापार तूट २ ते ३ अब्ज डॉलरने कमी होईल, असा आशावादही बँकेने व्यक्त केला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात आयातदारांनी देणी चुकविण्यासाठी आवश्यक डॉलरपैकी ७० टक्के तरी खरेदी करावे, असेही या बँकेने सुचविले आहे.
* वर्षअखेर ५६ पर्यंत सुधारणा शक्य : ‘क्रिसिल’चा कयास
सध्या साठी पार करणारे भारतीय चलन चालू आर्थिक वर्षअखेर डॉलरच्या स्तरावर ५६ पर्यंत सुधारताना दिसून येईल, असे संकेत क्रिसिल या पतमानांकन संस्थेने दिले आहेत. देशाच्या ताज्या अर्थस्थितीवर भाष्य करणारा अहवाल प्रकाशिक करताना पतमानांक संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे. अमेरिकन फेडरल रिझव्र्हच्या क्युई३च्या अनिश्चितितीमुळे भारतासारख्या देशातील विदेशी निधी (अल्प मुदतीचा पैसा म्हणजेच अमेरिकेत घेतलेले कर्ज) देशाबाहेर जात असल्याने रुपयातील घसरण पाहायला मिळत असून विदेशी गुंतवणुकीबाबत काही धोरणात्मक निर्णय सरकार पातळीवर होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. डॉलर-युरोतील वाढती दरी हा देखील स्थानिक चलनावर दबाव निर्माण करणारा घटक आहे. सध्याचा ६० चा स्तर पाहता रुपया केव्हाही पुढची, ६१ची पातळी गाठू शकेल, असा इंडिया फॉरेक्स अॅडव्हायजर्सचे संस्थापक अभिषेक गोयंका यांचा कयास आहे.
सोने-चांदी उतरले
भांडवली बाजारापाठोपाठ सराफा बाजाराची लकाकीही अवनत रुपयामुळे लुप्त पावत आहे. सोने दरातील महिन्यातील खालचा स्तर अद्यापही कायम असून मुंबईत तोळ्यासाठीचे सोने आता २६ हजार रुपयांवर येऊन ठेपले आहे. शहरात बुधवारी सोन्याचे दर १० ग्रॅममागे ६८० रुपयांनी घटून २६,१४५ रुपयांवर स्थिरावले, तर चांदीच्या भावातही मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदी किलोमागे थेट १,६९५ रुपयांनी घटून ४०,१७० रुपयांवर येऊन पोहोचली.
शेअर बाजारही धास्तावला
रुपयाची ऐतिहासिक पडझड पाहून भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावनांनाही जबर हानी पोहोचली आणि प्रतिक्रिया म्हणून बुधवारी सेन्सेक्स ७७.०३ अंश घसरणीसह १८,५५२.१२ वर स्थिरावला, तर २०.४० अंश घसरणीमुळे निफ्टी पुन्हा ५६०० खाली ५,५८८.७० वर बंद झाला. भांडवली बाजारात कालच्या सकारात्मक दिलाशानंतर, रुपयाने ६०ला घातलेली गवसणी पाहता समभागांची पडझड झाली. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी निधी काढून घेण्याचा कित्ता पुन्हा गिरविला आणि बाजाराच्या तसेच रुपयाच्या काळजीत आणखीच भर घातली. रुपया दिवसअखेर डॉलरच्या तुलनेत आणखी १.०६ रुपयांनी घसरत ६०.७२ वर थांबला. सेन्सेक्समधील १८ समभाग घसरले होते. भारती एअरटेल, महिंद्र अॅन्ड महिंद्र, टाटा मोटर्स या समभागांना जोरदार विक्रीचा तडाखा बसला.
आयटी मात्र तेजीत!
रुपयाच्या डॉलरपुढील लोटांगणाने नरमलेल्या शेअर बाजारात आयटी समभागांचे भाव मात्र बुधवारी ३ टक्क्यांनी उंचावले. सशक्त डॉलरमुळे भारतातील सॉफ्टवेअर कंपन्यांच्या निर्यात महसूल फुगणार असल्याचा शेअर बाजारात सूचिबद्ध आयटी कंपन्यांना लाभ मिळत असल्याचे दिसून आले. हेक्झावेअर टेक (३.१८%), टीसीएस (२.८४%), एचसीएल टेक (२.१५%), विप्रो (०.९७%) आणि इन्फोसिस (०.८२%) अशी आघाडीच्या समभागांची कमाई राहिली.