१९३० च्या आर्थिक मंदीची आठवण करून देऊन जगभरच्या मध्यवर्ती बँकप्रमुखांना अस्वस्थ करणाऱ्या आपल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांना एका शालेय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मात्र अंतर्मुख व्हावे लागले.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या दक्षिण मुंबईतील मुख्यालयात विद्यार्थ्यांचा एक गट नुकताच गेला होता. या वेळी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी थेट संवादाची संधीही त्यांना मिळाली. या संवादाप्रसंगी एका आठवीचा विद्यार्थी राजस मेहंदळेने गव्हर्नरांना, ‘आपण अमेरिकेच्या संभाव्य व्याजदर वाढीचा एवढा बाऊ करतो. पण भारताच्या अर्थधोरणाची जगाला दखल विचार करावयास लागेल, अशी वेळ कधी येईल काय?’ असा थेट सवाल केला. या प्रश्नावर काहीसे स्मित करून क्षणभर विचार केल्यानंतर राजन म्हणाले की, तू मोठा होऊन जेव्हा कमावत्या वयाचा होशील तेव्हा नक्कीच समस्त जगाला भारतीय अर्थधोरणाची दखल निश्चितच घ्यावी लागेल.
यानंतर डॉ. राजन यांनी संबंधित विद्यार्थ्यांचे कौतुकही केले. याबाबतची चित्रफीत सध्या समाजमाध्यमांमध्ये वेगाने फिरत आहे.
डॉ. राजन यांनी एका शाळेत यापूर्वी भाषण करताना ‘आपल्याला शालेय जीवनात गव्हर्नर होण्याची महत्त्वाकांक्षा नव्हती’ असे स्पष्ट केले होते. त्याचे कारण स्पष्ट करताना गव्हर्नर म्हणाले होते, आमच्या वेळी अनेक विद्यार्थ्यांना रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत, हेच माहीत नव्हते. मात्र आता माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे तशी स्थिती नाही.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थापनेस ८० वष्रे पूर्ण झाल्याबद्दल झालेल्या समारंभात पंतप्रधान मोदी यांनी राजन हे उत्तम शिक्षक असल्याचा आपण अनुभव घेत आहोत, अशा शब्दांत गव्हर्नरांचा गौरव केला होता. भारतात परत येण्यापूर्वी राजन हे शिकागो विद्यापीठाच्या बोथ स्कूलमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते, हा संदर्भ मोदी यांच्या वक्तव्यास होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा