करोना आणि शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारी तिजोरी खुली करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे या अर्थसंकल्पामधून दिसून आलं. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, रोजगारनिर्मिती करुन लोकांना हातात पैसा उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा हेतू अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केला. याचेच पडसाद लगेच भांडवली बाजारात म्हणजेच शेअर बाजारातही उमटले.

सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने दोन हजारांहून अधिक अंशांची उसळी घेतल्याचे पहायला मिळालं तर निफ्टीने साडेसहाशे अंशांनी झेप घेत १४ हजारांचा टप्पांही ओलांडला. हाच ट्रेण्ड मंगळवारीही दिसून येत आहे. आज बाजार सुरु झाल्यानंतर निर्देशांकाने एक हजारहून अधिक अंकांनी उसळी खाल्ली तर निफ्टीही १४ हजार ७०० च्या वर गेल्याचे पाहायला मिळालं. विशेष म्हणजे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीत असण्याचा हा दुर्मिळ योग जवळजवळ दोन दशकांनंतर जुळून आल्याचे सांगण्यात येत आहे.

सेन्सेक्सने तब्बल १४०० अंशांहून अधिक उसळी खाल्ली असून यामुळे ५० हजारांचा टप्पा आज पहिल्या सत्रामध्येच ओलांडला आहे. तर निफ्टीनेही तीन टक्क्यांनी उसळी घेत १४ हजार ७०० चा टप्पा गाठला. करोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सरकारी तिजोरी खुली करत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्याच्या घोषणा केल्यानंतर त्याचा साकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. भारताबरोबरच आशियामधील इतर देशांतील शेअर बाजारामध्येही तेजी असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा होण्याची अपेक्षा आणि जागतिक अर्थव्यवस्था सुरळीत होण्याचे संकेत यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळी १० वाजता सेन्सेक्स एक हजार ३९८ अंशांनी वधारला. सेन्सेक्सने ५० हजार ५ अंशांपर्यंत उसळी मारली. तर निफ्टीने ३९८ अंशांची उसळी घेत १४ हजार ७०५ चा टप्पा गाठला. सर्वच्या सर्व ११ क्षेत्रांमध्ये बाजारातील व्यवहार सुरु झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात खऱेदी झाल्याचे पहायला मिळालं. वाहन उद्योग, एफएमजीसी, आयटी, इन्फ्रा कंपन्या, धातू निर्मिती कंपन्यांमध्ये दीड ते तीन टक्क्यांपर्यंत वृद्धी दिसून आली.

Story img Loader