देशातील सर्वात मोठी प्रवासी वाहन निर्माती असलेल्या मारुती सुझुकीच्या भाग भांडवलात वाटा वाढविण्याचे प्रयत्न जपानची प्रवर्तक कंपनी सुझुकी मोटर्स कॉर्पोरेशनने चालविले आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून मारुतीच्या व्यवस्थापनाने प्रवर्तकांखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा भागभांडवलात वाटा असलेल्या भारतीय आयुर्वमिा महामंडळ अर्थात एलआयसीच्या अधिकाऱ्यांची मुंबईत भेट घेतली.
सुझुकीने जपानच्या एका गुंतवणूक सल्लागार संस्थेची यासाठी नेमणूक केली असून या संस्थेकडून एलआयसीला सादरीकरण करण्यात आले. मारुतीच्या अन्य मोठय़ा भागधारकांच्या येत्या आठवडय़ात भेटी घेतल्या जाणार आहेत. दोन्हीकडच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी आमच्या भांडवली हिस्सेदारांना कंपनीबद्दल माहिती देण्यासाठी नियमित भेटी होत असतात, असे मारुतीच्या सूत्रांनी सांगितले. मागील आठवडय़ात मारुतीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सुझुकीचे अध्यक्ष ओसामा सुझुकी यांच्या वक्तव्याचा हवाला देत स्पष्ट केले की, सध्या सुझुकीचा भांडवली हिस्सा वाढविण्याचा विचार नाही, परंतु भविष्यात शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय उपकंपन्यांमधील भागभांडवल युनिलिव्हरने वाढविले तर याच कारणाने प्रस्तावित ग्लॅक्सोची खुली विक्री सेबी व रिझव्‍‌र्ह बँक व केंद्र सरकाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांनंतर सुझुकी आपला मारुतीतील वाटा कमाल मुभा आहे तिथपर्यंत म्हणजे ७५% पर्यंत वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. जर सुझुकीने मारुतीच्या खुल्या खरेदीचा देकार दिला तर हा बुधवारच्या बंद भावानुसार १२ हजार कोटींचा म्हणजे भारतीय उद्योग क्षेत्रातील सर्वात मोठी खुली खरेदी ठरणार आहे. बाजारात ही बातमी येताच मारुतीच्या समभागात मोठी खरेदी सुरू झाली व मारुतीच्या भावाने १८६० रुपये असा सार्वकालिक उच्चांक प्रस्थापित केला. दरम्यान, या घटनेचा हवाला देत मागील एका आठवडय़ात काही दलाल पेढय़ांनी मारुतीवर आपले संशोधन अहवाल प्रसिद्ध केले असून एका वर्षांचे लक्ष्य २३०० रु. ते २५०० रु. दरम्यान राहण्याचे या अहवालात नमूद केले आहे.
* मारुतीमध्ये सुझुकीचा ५६.२१%, तर प्रवर्तकांनंतर एलआयसीचा ८.२१% सर्वात मोठा भांडवली वाटा
*  एलआयसीच्या पहिल्या पाच गुंतवणुकीत मारुतीचा समावेश
* भारताच्या प्रवासी वाहन बाजारपेठेत ४०% हिस्सा असलेल्या मारुतीचे बुधवारच्या बंद भावानुसार बाजारमूल्य ५५,५५७ कोटी रुपये आहे.
* सुझुकीकडून जागतिक विक्रीत वाहनसंख्येच्या तुलनेत ५०% तर विक्री उत्पन्नाच्या २५% वाटा भारतातील उपकंपनी मारुतीचा आहे.