नव्या २०१६ वर्षांची पहाट ही ‘एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.’ या संक्षिप्त नावाने सुरू करणाऱ्या शामराव विठ्ठल सहकारी बँकेने, नववर्षदिनी नवीन १० शाखांतून कार्यारंभ सुरू करून आपला एकूण शाखाविस्तार १९२ वर नेला आहे. बहुराज्यात विस्तार असलेल्या या बँकेच्या या नवीन शाखा मुंबईत- नालासोपारा (पश्चिम), मीरा रोड (शांती गार्डन), ठाकूर व्हिलेज (कांदिवली- पूर्व), करिरोड येथे, त्याचप्रमाणे डोिबवली (राजाजी पथ), पुणे- रविवार पेठ व लॉ कॉलेज रोड येथे तसेच औरंगाबाद-सिडको, बंगळुरू- बनासवाडी आणि तामिळनाडू- सेल म येथे सुरू झाल्या. दूरस्थ (वेबकास्ट) यंत्रणेद्वारे एसव्हीसी बँकेचे अध्यक्ष सुरेश हेमाडी यांनी मुंबईतील मुख्यालयात आयोजित समारंभात या नवीन शाखांचे उद्घाटन केले.
नवीन १० शाखांची भर पडल्याने, चालू आर्थिक वर्षांत २०० शाखांच्या निर्धारित लक्ष्याच्या आणखी जवळ पोहोचलो आहोत, असे या प्रसंगी बोलताना एसव्हीसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुहास सहकारी यांनी सांगितले. देशाच्या विविध १० राज्यांमध्ये विस्तार फैलावलेल्या आणि १०९ वर्षांचा विश्वासार्ह वारसा लाभलेल्या बँकेने ऑक्टोबर २०१५ अखेर २१,००० कोटी रुपयांचा एकूण व्यवसायाचा टप्पा ओलांडला आहे.