स्वच्छ भारत मोहीम केवळ सरकारपुरस्कृत न राहता, लोकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजवणे आणि काहीसे प्रलोभन, प्रोत्साहन देऊन या मोहिमेत लोकसहभाग मिळविण्याच्या हेतूने तंत्रज्ञानाधारित नवोद्योग ‘ट्रेस्टर’ने मूळ धरले आहे. वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या आणि अ‍ॅल्युमिनियमचे कॅन असा पुनर्वापरयोग्य कचरा गोळा करण्यासाठी या कंपनीने आपल्या ‘स्वच्छ यंत्रा’चे येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत अनावरण केले.
निरोगी आणि जबाबदार समाजाची निर्मितीच्या उद्देशाने ट्रेस्टर हे एक मोबाइल अ‍ॅप म्हणून विकसित करण्यात आले असून, केवळ स्वच्छतेची संकल्पना राबविणारे मध्यस्थ म्हणून ते भूमिका निभावेल, असे ट्रेस्टरचे संस्थापक कुणाल दीक्षित यांनी स्पष्ट केले. उल्लेखनीय म्हणजे या उपक्रमाचा महत्त्वाचा घटक असलेले अत्यंत किफायती असे स्वच्छ यंत्र हे आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी बनविले आणि तेथील वसतिगृहातच त्याच्या पहिल्या वापरातून साप्ताहिक प्लास्टिक कचरा १० किलोने कमी झाल्याचा यशस्वी प्रयोगही त्यांनी करून दाखविला आहे.
हे एक इंटरनेट जोडणी आणि सात इंची डिजिटल डिस्प्ले स्क्रीन असलेले यंत्र असून तळाला कचरा साठवणूक व रिसायकलिंग यंत्र आणि वरच्या बाजूला आरओ तंत्रज्ञानावर आधारित जलशुद्धीकरण यंत्र त्यात सामावले आहे. ग्राहकांच्या स्वच्छतेबाबत दक्षतेला प्रोत्साहन म्हणून त्यांच्याकडून यंत्रात टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक वापरलेल्या बाटली अथवा कॅनच्या बदल्यात ३०० मि.लि. स्वच्छ पिण्याचे पाणी दिले जाईल. पाणी नको असल्यास ‘ट्रेस्ट’ नावाचे डिजिटल मूल्य असलेले कूपन दिले जाईल, ज्याची पोच पावती ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर मिळेल, अशी संकल्पना दीक्षित यांनी विशद केली.
विशेषत: रेल्वे व बस स्थानके, तीर्थस्थळे व गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणांवर स्वच्छता प्रसार व पेयजल वितरण असा स्वच्छ यंत्राचा वापर दुहेरी फायद्याचा ठरेल, असा दीक्षित यांचा विश्वास आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये किमतीपासून सुरू होणाऱ्या या यंत्रासाठी सरकार तसेच खासगी क्षेत्रातून जवळपास ४० संस्थांबरोबर अंतिम स्वरूपातील बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय कचऱ्याच्या पुनर्वापरातून यंत्राच्या चालकांना आर्थिक लाभही मिळविता येईल. हे डिजिटल यंत्र असले तरी मजबूत बांधणी आणि सौर विजेच्या वापरामुळे देखभालीचा खर्चही शून्य राहील, अशी त्यांनी ग्वाही दिली.
गोळा होणाऱ्या ट्रेस्ट कूपनचा विनियोग गरज पडेल तेव्हा पाण्यासाठी फोनधारकांना करता येईल. पुढे जाऊन संचयित ट्रेस्ट कूपन्सवर नागरिकांना अनेक वेगवेगळे लाभ देण्याचीही कंपनीची योजना आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिकच्या बाटल्या व कॅनव्यक्तिरिक्त अन्य प्रकारच्या कोरडय़ा कचऱ्यासाठी यंत्रात आवश्यक ते बदलासाठी काम सुरू असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या ग्रामीण भागात अशा उपक्रमाचे दुहेरी लाभ नागरिकांना मिळविता येतील. स्वच्छतेबाबत दक्ष नागरिक स्मार्टफोनचा वापरकर्ता नसेल हे गृहीत धरून ग्रामीण भागातील यंत्रावर कूपन्स छापील स्वरूपात देण्याचीही सोय केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा