सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेने भांडवलाची सर्वाधिक चणचण असलेल्या, पण प्रचंड व्यवसायक्षमता असलेल्या सूक्ष्म-लघू व मध्यम उद्योगक्षेत्राला लक्ष्य करून देशभरात सर्वत्र या क्षेत्रातील होतकरू उद्योजकांच्या मेळावे घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या प्रकारचा पहिला मेळावा पीनया इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सहयोगाने बंगळुरू येथे झाला, त्या कार्यक्रमाचे सिंडिकेट बँकेचे कार्यकारी संचालक टी. के. श्रीवास्तव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आपल्या बँकेने व्याजदरात कपात, प्रक्रिया शुल्कात सवलत, उद्योगक्षेत्रे निश्चित करून नवीन योजना आणि या क्षेत्रांतील होतकरूंसाठी कर्ज मेळावे, जागृती शिबिरे उपक्रमांबरोबरीने शाखास्तरावरील कर्मचाऱ्यांमध्ये लघुउद्योजकांबद्दल आस्था निर्माण करण्याचेही काम केले आहे, असे प्रतिपादन श्रीवास्तव यांनी केले.
सिंडिकेट बँकेने अलीकडेच ‘सिंड महिलाशक्ती’ ही स्त्री उद्योजिकांच्या प्रोत्साहनार्थ नवीन योजना सुरू केली.  १५ ते २० डिसेंबर या सप्ताहादरम्यान देशभरात विशेष मोहिम राबवून १७,५०० महिला उद्योजिकांना तब्बल २५० कोटींची कर्जमंजुरी देऊन बँकेच्या नवीन इतिहासात नवीन मैलाचा दगड रचला, अशीही श्रीवास्तव यांनी माहिती दिली.