मुंबईतील फ्लीटकॅब सेवा ‘टॅबकॅब’ने नुकताच आपल्या वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण केला असून, येत्या मार्चपर्यंत आपल्या वाहनताफ्यात आणखी १२०० टॅक्सीज्ची भर घालत असल्याची घोषणा केली आहे. टॅबकॅबने ४००० टॅक्सीसाठी परवाने यापूर्वीच मिळविले असून, एकूण ताफा वर्षभरात टप्प्याटप्प्याने ४००० वर नेण्याचे नियोजन आहे.
तफ्यातील नव्या विस्तारानंतर मुंबईतील फ्लीट टॅक्सी सेवेत ‘टॅबकॅब’चा जवळपास ७० टक्के बाजारहिस्सा होईल, असे ही सेवा चालविणाऱ्या एसएमएस टॅक्सीकॅब प्रा. लि.चे मुख्य विपणन अधिकारी प्रसनजीत बागची यांनी सांगितले. निविदा प्रक्रियेतून रीतसर परवाने मिळविणारी पहिली सेवा असण्याबरोबरच, प्रवासी वाहनातील सर्वोत्तम टोयोटा इटिऑस आणि मारुती सुझूकी एसएक्स४ यांना टॅक्सी म्हणून वापरात आणून टॅबकॅबने मुंबईतील फ्लीट कॅब सेवेला एक नवे परिमाण मिळवून दिले असल्याचे बागची अभिमानाने सांगतात. तथापि प्रवासाअंतर्गत टॅक्सीमध्ये माहिती व मनोरंजनाची विशेष सोय, सेवा गुणवत्ता आणि दर रचना या सर्वाबाबत टॅबकॅब आपले वैशिष्टय़पूर्ण स्थान निर्माण केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सेवेने ‘टॅबकॅब गोल्ड’ नावाने अतिरिक्त दर आकार असलेली उच्च धाटणीचा सेवा प्रकार सुरू करूनही वेगळेपणाचा ठसा उमटविला आहे.
कंपनीने आपल्या टॅक्सीचालकांना एकूण व्यवसायातील भागीदार म्हणून वागणूक देताना, त्यांनी ‘साथी’ असे संबोधन वापरले आहे. कंपनीच्या सेवेत असलेले सर्व साथी हे नवीन तंत्रज्ञानाचा वापरास सक्षम आणि व्यवहार व संवाद कौशल्याचे प्रशिक्षण प्राप्त केलेले असल्याचे बागची यांनी सांगितले. कंपनीने मनुष्यबळ विकास धोरण म्हणून ‘साथी आधार’ हा उपक्रम स्वीकारला असून, ज्यायोगे चालकांना दरमहा रु. १२ हजार इतक्या किमान प्राप्तीची हमी तसेच मासिक हक्काची सुट्टी, आजारपणाची सुट्टी, संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विम्याचे संरक्षण तसेच चालकाच्या एका अपत्याच्या शिक्षणाचा खर्च टॅबकॅबकडून केला जातो. शिवाय ‘साथी घुमक्कड’ या प्रोत्साहनपर योजनेत गुणात्मक कामगिरीच्या आधारे प्रत्येक महिन्यात एका चालकाचा कुटुंबासह विमानप्रवासासह सर्वसमावेशक तीन दिवसांच्या देशांतर्गत सहलीचा संपूर्ण खर्च कंपनीकडून केला जातो.
‘टॅबकॅब’ने प्रयोग म्हणून सुरू केलेल्या आणि खूपच यशस्वी ठरलेल्या सायंकाळी ८ ते सकाळी ८ पर्यंतच्या काळात ‘शून्य निरसन (कॅन्सलेशन)’चे अभिवनच, मार्चपासून ताफ्यात वाढ होण्याबरोबरीने संपूर्ण दिवसासाठी राबविले जाईल, असेही बागची यांनी स्पष्ट केले. या अभिवचनानुसार ग्राहकाने आरक्षित केलेल्या सेवेत विलंब अथवा ती पूर्ण न करता आल्यास टॅबकॅबकडून ग्राहकांना भरपाई मिळविण्याची हमी दिली जाते.
  मुंबईच्या रस्त्यावरील टॅक्सी सेवा ढोबळ अंदाज..
३०,०००         काळ्या-पिवळ्या टॅक्सी
६,०००         कूल कॅब्स
५,३५०        फ्लीट कॅब
७,०००        प्रत्यक्षात प्रवासी संख्येनुसार गरज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा