कोणता शेअर दलाल चांगला आणि सुरक्षित? कमीत कमी ब्रोकरेज कोण घेतो वगरे प्रश्न अनेकदा माझ्या व्याख्याना दरम्यान विचारले जातात. वस्तुत: जो दलाल स्टॉक एक्सचेंजवर अधिकृतपणे नोंदणी केलेला असेल तर तो सुरक्षितच असतो. कारण तिथे येण्याचे आधी त्याला सेबीकडून नोंदणीचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. हे प्रमाणपत्र मुख्य दलाल, उप दलाल यांच्या कार्यालयात भिंतीवर लावलेले असणे हे बंधनकारक असते. त्यामुळे करोडो रुपयांचे व्यवहार करणारा दलाल, सुरक्षित आणि लाख रुपयांचे थोडेसे व्यवहार करणारा उप दलाल धोक्याचा असे काही नाही.
दलाल छोटा असो की मोठा दोघांच्याबरोबर आपण केलेले व्यवहार यांना स्टॉक एक्सचेंज पाठबळ देते. दुर्दैवाने दलाल दिवाळखोरीत गेला तर बीएसईकडे कोटय़वधी रुपयांचा ‘ट्रेड गॅरंटी फंड’ आहे. ज्यामुळे आíथक पेच प्रसंग उद्भवणार नाही. तसेच दलाल बुडीत गेल्यास गुंतवणूकदाराला १५ लाख रुपये संरक्षण असते. नुकतेच बीएसईएचे उप महाव्यवस्थापक योगेश बांबर्डेकर यांनी ही माहिती दिली.
कोणताही ब्रोकर अडीच टक्के जास्तीत जास्त ब्रोकरेज घेऊ शकतो; मात्र प्रत्यक्षात त्याहूनही कितीतरी कमी ब्रोकरेज घेतले जाते. कारण या क्षेत्रातील स्पर्धा! कमी ब्रोकरेज असलेले दलाल शोधण्यात अनेक मंडळी आपला वेळ खर्च करतात. पण व्यावहारिक विचार केला तर ही पायपीट अनाठायी ठरते.
उदाहरणार्थ, मी १० हजार रुपयांचे शेअर्स घेतले. १० पसे दलाली म्हणजे शंभर रुपयाला १० पसे म्हणजे ०.१ टक्के दर झाला दलालीचा. या दराने ब्रोकरेज होते १० रुपये. समजा दुसरा दलाल पाच पसे दराने ब्रोकरेज लावीत असेल तर ब्रोकरेज होते पाच रुपये. मग मी त्या दुसऱ्या ब्रोकरच्या मागे धावण्यात अर्थ नाही.
अशासाठी की प्रत्यक्षात बहुतांशी दलाल मंडळी किमान ब्रोकरेज लावणार जे २० रुपये किंवा २५ रुपये असू शकते! म्हणजे दोघांपकी कुणीही निवडला तरी तो २५ रुपये घेणार. हा फरक कुणाला पडेल तर जी व्यक्ती करोडो रुपयांचे व्यवहार करीत असेल तिला. इतका सरळ साधा विचार अनेक जण करीत नाहीत. बहुसंख्य दलाल किमान दलाली २० ते २५ रुपये आकारताच कारण १०० रुपयांचे शेअर्स तुम्ही खरेदी केलेत तर १० पसे दलालीत त्याचा प्रपंच चालणार कसा?
आपण बहुतांशी गुंतवणूकदार हे लहान गटात मोडणारे असल्याने हे पाच पसे, सात पसे याने आपल्याला फरक पडत नाही. अनेक दलाल ‘झीरो ब्रोकरेज’ असे सांगतात, त्याचे काय असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत ‘आरके एसव्ही’चे सागर शिंदे यांना विचारले असता त्यांनी खुलासा केला.
सागर शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, १,९४७ रुपये एका महिन्याला ठोस रक्कम दलाली म्हणून दलालला दिले तर तो याहून जास्त एक रुपया दलाली आकारणार नाही. अगदी १० कोटी रुपयांचे व्यवहार केलेत तरीही. आता गणित करायचे तर एक कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले किंवा विकले तर १० पसे दराने ब्रोकरेजची रक्कम होणार असते १०,००० रुपये. ते १०,००० न देता १,९४७ रुपयात काम झाले की!
तरीदेखील काही दलाल (फारच थोडे) जितकी दलालीची रक्कम होईल, उदाहरणार्थ – ३.६० रुपये तर केवळ तितकीच दलाली घेतात. आता त्यांना हे कसे परवडते याला उत्तर आहे वरील १९४७ रुपये योजनेत.
अनेक मोठे गुंतवणूकदार त्या दलालकडे व्यवहार करीत असतात. त्यामुळे छोटय़ा गुंतवणूकदारांना ही सवलत देणे त्याला परवडते. घरात लग्नकार्यासारखे मोठे समारंभ झाले की त्यातच आपण सत्यनारायणाची पूजा उरकून घेतो. कारण त्यासाठी वेगळा असा काही खर्च येत नाही. त्यातलाच हा प्रकार! कुणी विचारेल की, असे ३.६० रुपये वगरे घेणारे दलाल आम्हाला कुठे भेटतील? संबंधितांच्या वेब साइटवर हा सर्व तपशील दिलेला असतो.
कार्यक्रमाच्या निमिताने मी खूप भ्रमंती करीत असतो. तेव्हा असे अनेक ब्रोकर आणि त्यांचे चार्जेस याबाबत माहिती मिळत असते. पण कुणा विशिष्ट  ब्रोकरला ‘प्रमोट’ करतो असा दोषारोप मला नको. म्हणून त्यांचा उल्लेख लेखात किंवा भाषणात मी करीत नाही. इतके हे सोपे गणित आहे. पण ते सोपे करून कुणी सांगत नाही. म्हणून गुंतवणूकदारांच्या मनात गोंधळ उडतो. त्यात त्यांचा दोष नाही. श.शेअर बाजाराचा या लेखमालेचा आणि व्याख्यानांचा तोच तर हेतू आहे.

प्रतिसाद..
अभिजीत बापट यांचे रिलायन्स सिक्युरिटीजमध्ये थ्री इन वन खाते आहे. ते त्याना सास सिक्यरिटीज यांचेकडे बदलायचे आहे. दोन्ही ठिकाणी खाती सुरू ठेवता येतात का, असेही ते विचारतात. दोन्ही ठिकाणी खाती सुरू ठेवू शकता. अर्थात दोन खात्यांचे वार्षकि शुल्क भरावे लागतील हे उघड आहे. तथापि सोय म्हणून तुम्ही एका डीपीकडील सर्व शेअर्स दुसऱ्या डीपीकडे विनामूल्य हस्तांतरित करून पहिले डिमॅट खाते बंद करू शकता. पहिल्या ठिकाणी ट्रेिडग खात्यात जो काही हिशेब बाकी असेल ती चुकती करा म्हणजे झाले. मात्र रिलायन्सकडे ट्रेडिंग खाते आणि सासकडे डिमॅट अशी व्यवस्था थ्री  इन वन प्रणालीत चालणार नाही. मनाली नाईक यांची आई आणि भाऊ असे संयुक्त खाते आहे. आईच्या पश्चात ते शेअर्स मनाली यांना मिळावेत, अशी त्यांची इच्छा आहे. इच्छापत्र करून तसे करता येईल का, असे त्या विचारतात. तसेच अन्य काही सोपा मार्ग सुचवा, अशी त्यांनी विनंती केली आहे. संयुक्त खात्यात एक खातेदार निधन पावला तर जिवंत असलेल्या सह खातेदाराला ते शेअर्स मिळणार. इच्छापत्र इथे लागू होत नाही. सोपा मार्ग म्हणजे आई आणि मनाली यांनी संयुक्त डिमॅट खाते उघडून त्यात सर्व शेअर्स हस्तांतरित करून घ्यावेत आणि आई-भाऊ यांचे खाते बंद करावे. शेअर कुठल्याही खात्यातून कुठल्याही खात्यात हस्तांतरित करता येतात. भारतात टी+१ प्रणाली कधी येणार असे रत्नागिरीहून अॅड. जाई आगाशे विचारतात. जेव्हा सर्व बँकांच्या सर्व शाखांत आरटीजीएस कार्यरत होईल तेव्हा हे शक्य आहे. मात्र जीसेक म्हणजे गव्हर्नमेंट सेक्युरिटीज बाबतीत सांगायचे तर तिथे टी+० अशी व्यवस्था केव्हाच सुरू झाली आहे. रणजित ढिसळे यानी बार्शी येथे श..शेअर बाजाराचा हा कार्यक्रम का करीत नाही, अशी प्रेमळ तक्रार केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या ग्रथ संचालनायाच्या सूचनेनुसार अनेक वाचनालयांनी माझ्या विनामूल्य व्याख्यानांचे आयोजन करायला सुरुवात केली आहेच. १५ तारखेला सायंकाळी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या गोरेगाव (पूर्व) शाखेने आर्थिक साक्षरता आणि शेअर बाजार हे माझे विनामूल्य व्याख्यान आयोजित केले आहे.

Story img Loader