व्यवस्थापन व कामगार यांच्यातील वेतन वाढीसह कंपनी समभाग अदा करण्याबाबतच्या वादावर तोडगा न निघाल्याने बजाज ऑटोमधील संप कायम राहिला आहे. कंपनीच्या चाकण येथील प्रकल्पात बुधवार सकाळपासून संप सुरू आहे. या आंदोलनात कायम आणि कंत्राटी असे १,५०० हून कर्मचारी सहभागी झाले आहेत. कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्या प्रतिनिधींची शुक्रवारी सकाळी चर्चा झाली. मात्र वेतन वाढ न देण्याबाबत ठाम असलेल्या व्यवस्थापनासमोर संप कायम असल्याचे संघटना नेत्यांनी स्पष्ट केले. कामगारांना कंपनीचे समभाग सवलतीत मिळावे या मागणीची जोड असणारा हा संप दोन दिवस आधीच सुरू झाला होता. प्रत्यक्षात गुरुवारच्या संपाची यापूर्वी नोटीस देण्यात आली असताना कामगारांनी बुधवार सकाळपासूनच प्रकल्पातील कामावर रुजू होण्यास नकार दिला. संपामुळे कंपनीच्या जून तसेच जुलैमधील दुचाकी निर्मितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी दिला होता.