मुंबईस्थित आभूषणांच्या निर्माता, निर्यातदार आणि प्रथितयश पेढी असलेल्या तारा ज्वेल्सने भांडवली बाजारातून रु. १७९.५ कोटी उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. कंपनीच्या समभागांची खुली प्रारंभिक विक्री येत्या २१ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान प्रति समभाग रु. २२५ ते रु. २३० या किंमत पट्टय़ादरम्यान बोलीने होणार आहे. सामान्य गुंतवणूकदारांना या भागविक्रीत किमान ५० समभागांसाठी आणि त्यापुढे ५० समभागांच्या पटीत अर्ज करून सहभागी होता येईल.
जगभरातील अनेक बडय़ा विक्री शृंखलांसाठी सोन्याची तसेच हिरेजडीत आभूषणांची निर्यात करणाऱ्या या कंपनीची ‘तारा ज्वेलर्स’ नामक ३० आधुनिक पेढय़ांचे जाळे देशभरात सध्या कार्यरत आहे. भागविक्रीतून उभ्या राहणाऱ्या निधीतून आणखी २० स्टोअर्स मार्च २०१३ मुंबईसह उत्तर भारतातील १९ शहरांमध्ये सुरू करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. विद्यमान तसेच भविष्यातील सर्व स्टोअर्स कंपनीच्या मालकीची असून, विक्रीसाठी असलेली सर्व आभूषणांची निर्मिती कंपनीकडूनच केली जाते.
भागविक्री-पूर्व झालेल्या सामंजस्यातून डॅनियल स्वारोस्की प्रवर्तित क्रिस्टलॉन फिनॅन्झ एजी या कंपनीने तारा ज्वेल्समध्ये ९.०९ टक्के समभाग खरेदी केले आहेत. संस्थापक प्रवर्तक आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव शेठ यांची ७३.१५ टक्के समभागांवर मालकी आहे. तर १६.३६ टक्के हिस्सा असलेल्या हाँगकाँगस्थित फॅब्रिकांट ट्रेडिंग लि.ची कंपनीतील भागमालकी प्रस्तावित भागविक्रीमार्फत सौम्य होणार आहे. भागविक्रीतील रु. १७९.५ कोटींपैकी रु. ७० कोटी फॅब्रिकांटला प्राप्त होतील.    

Story img Loader