नव्या आर्थिक वर्षांसाठी निर्गुतवणुकीतून अधिक रक्कम उभारण्याचा संकल्प सरकारने केला आहे. या माध्यमातून मार्च २०१३ अखेर ३०,००० कोटी रुपयांच्या निधी उभारणीचे लक्ष्य ठेवणाऱ्या केंद्र सरकाने आगामी कालावधीत ही रक्कम ४०,००० कोटी रुपये असेल, असे सुतोवाच केले आहे.
निर्गुतवणूक विभागाचे सचिव रवि माथूर यांनी याबाबत म्हटले आहे की, निर्गुतवणूक विभागांतर्गत झालेल्या प्राथमिक चर्चेनुसार २०१३-१४ मध्ये ४०,००० कोटी रुपयांचा सरकारचा निर्गुतवणूक कार्यक्रम असण्याची शक्यता आहे. यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील २० कंपन्यांमधील सरकारचा हिस्सा कमी करण्यात येईल. त्या कोणत्या असतील, हेही सरकारने जवळपास निश्चित केले आहे.
कोल इंडिया, इंडियन ऑईल, एनएचपीसी, नेप्को यांचा नव्या आर्थिक वर्षांत समावेश असेल. तर भेल, हिंदुस्थान अ‍ॅरोनॉटिक्सच्या निर्गुतवणुकीला मंजूरी देण्यात आली आहे. पहिल्या तिमाहीत हिंदुस्थान कॉपरची पुन्हा भांडवली बाजारात धडक बसेल.
हिंदुस्थान कॉपरद्वारे नोव्हेंबर २०१२ मध्ये ५.५८ टक्के हिस्सा ८०७ कोटी रुपयांना विकण्यात आला होता. तर याच दरम्यान एनएमडीसीतील १० टक्के हिस्सा विकून सरकारने ५,९०० कोटी रुपये उभारले होते. ऑईल इंडिया आणि एनटीपीसीतूनही अनुक्रमे ३,१४१ आणि ११.४९६ कोटी रुपये उभारेले गेले आहे. यातील हिस्सा सरकारने १० टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.
यापूर्वी निर्गुतवणुकीच्या माध्यमातून उभारण्यात येण्यासाठी निश्चित केलेली ४०,००० कोटी रुपयांची रक्कम सरकारने कमी करून ती ३०,००० कोटी रुपयांची केली होती. चालू आर्थिक वर्ष संपण्यास महिन्याचा कालावधी शिल्लक असताना यामाध्यमातून सरकारच्या तिजोरीत आतापर्यंत केवळ २१,५०० कोटी रुपयेच जमा झाले आहेत. यंदाचे उद्दीष्टही २७,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास सरकारला आहे.
चालू आर्थिक वर्षांतील उर्वरित कालावधीत निगुर्ंतवणुकीच्या माध्यमातून नाल्को, एमएमटीसी, सेल आणि आरसीएफ कंपन्या भांडवली बाजारात उतरविल्या जाणार आहेत.