टायटन, वेस्टसाइड, क्रोमासह अन्य उत्पादनांना ‘टाटाक्लिक’चे व्यासपीठ
उत्पादनांच्या विक्रीकरिता आपल्या लोकप्रिय नाममुद्रांना नव्या जमान्याच्या ई-व्यापार मंचाची जोड देण्याच्या मानसाने टाटा समूहाने या क्षेत्रात आता प्रत्यक्ष उडी घेतली आहे. स्नॅपडिल, फ्लिपकार्टसारख्या कंपन्या या क्षेत्रात येऊन स्थिरावल्यानंतर या क्षेत्रात प्रथमच देशांतील परंपरागत बडय़ा उद्योगघराण्याने टाटांच्या रूपात रस दाखविला आहे. समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी गेल्या काही वर्षांत व्यक्तिगत गुंतवणुकीद्वारे अनेक ई-कॉमर्स कंपन्यांत दाखविलेला रस नव्या ‘टाटाक्लिक डॉट कॉम’च्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरला आहे.
टाटा समूहाच्या टाटाक्लिक या संकेतस्थळाचे उद्घाटन टाटा सन्सचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या हस्ते समूहातील वस्त्रप्रावरण विक्री क्षेत्रातील आघाडीच्या वेस्टसाइडच्या दक्षिण मुंबईतील एका दालनात शुक्रवारी झाले. या वेळी समूहातील अन्य एक किरकोळ विक्री कंपनी ट्रेंट लिमिटेडचे अध्यक्ष नोएल टाटा, टाटा इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक के. आर. एस. जमवाल, टाटाक्लिक डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष पांडे आदी उपस्थित होते.
समूहातील क्रोमा, वेस्टसाइड, तनिष्क, टायटन आदी विविध उत्पादनांची ४०० हून अधिक दालन साखळी भारतात सध्या आहे. नव्या टाटाक्लिकमध्ये समूहातीलच टाटा इंडस्ट्रीजचा सर्वाधिक ९० तर ट्रेंट लिमिटेडचा उर्वरित १० टक्के हिस्सा आहे.
कंपनीचे स्वतंत्र संकेतस्थळ तसेच अॅपच्या माध्यमातून समूहातील स्वत:सह अन्य ४०० नाममुद्रांची २ लाखांहून अधिक वस्तू खरेदी करता येतील. ९९ रुपयांवरील तयार वस्त्र, गॅझेट, शोभेच्या वस्तू आदी येथे उपलब्ध होईल.
भारतात सध्या ३ कोटी ग्राहक ऑनलाइन व्यासपीठाद्वारे विविध उत्पादने, वस्तूंची खरेदी नियमितपणे करतात. ही संख्या नजीकच्या भविष्यात १० कोटी होण्याचा या उद्योगाचा अंदाज आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा