टाटा स्टीलचे माजी जनसंपर्क प्रमुख चारुदत्त देशपांडे यांच्या कथित आत्महत्येशी निगडित वस्तुस्थितीला जाणून घेण्यासाठी टाटा समूहाने चार सदस्यांच्या समितीची नियुक्ती घोषित केली आहे. टाटा स्टीलचे बिगर-कार्यकारी संचालक इशात हुसैन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आगामी दोन महिन्यांत अहवाल देणे अपेक्षित असल्याचे टाटा सन्स आणि टाटा स्टील यांनी संयुक्तपणे जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
इशात हुसैन यांच्यासह या समितीत टाटा समूहाचे मुख्य नैतिकता अधिकारी मुकुंद राजन, मुख्य मनुष्यबळ अधिकारी एन. एस. राजन आणि समूहाचे विधिज्ञ भरत वसाणी हे अन्य सदस्य आहेत. चारुदत्त देशपांडे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या परिस्थितीची चौकशी निष्पक्ष चौकशी केली जावी, अशा आशयाचे पत्र आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक के. रामकुमार यांनी व्यक्तिगत योग्यतेत ३० जून रोजी लिहिले होते. या पत्राची दखल घेऊनच टाटा समूहाकडून हे पाऊल टाकले गेले आहे. कृष्णकुमार यांनी टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा, विद्यमान अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि टाटा सन्सचे संचालक आर के. कृष्णकुमार यांना हे पत्र लिहिले होते.
जमशेदपूर येथे देशपांडे यांना स्वत:ला घरात कोंडून घ्यावे अशा प्रचंड तणाव व दबावाखाली काम करावे लागत होते, असा आरोप कृष्णकुमार यांनी आपल्या पत्रात केला आहे. त्यांना धमक्या मिळत होत्या आणि त्यांच्या फोन-संभाषणांवरही करडी नजर होती, असेही त्यांनी म्हटले आहे.
कृष्णकुमार यांनी पत्रात केलेल्या आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना टाटा समूहाने स्पष्ट केले की, ‘‘पत्रात करण्यात आलेले आरोप खूप गंभीर स्वरूपाचे असून, नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे निश्चित करण्याची सुयोग्य प्रक्रिया राबविली जाईल आणि तद्नुसार कारवाईही केली जाईल.’’

Story img Loader