‘मूडिज’ने मूल्यांकन वाढविल्याने टाटा समूहातील जवळपास सर्वच कंपन्यांचे समभाग मूल्य शुक्रवारी मुंबईच्या शेअर बाजारात वधारले. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने समूहातील सहा कंपन्यांचे मानांकन गुरुवारी उंचावले होते. याचा परिणाम बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या समभागांवर झाला. मूल्यांकन वधारलेल्या टीसीएस व टाटा स्टीलच्या मूल्यांमध्ये २.७१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली, तर मूल्यांकनात बदल न झालेल्या मात्र सूचिबद्ध असलेल्या टाटा स्पोन्जे व टाटा एलक्सीचे समभाग मूल्य अनुक्रमे १३.५८ व १०.३० टक्क्यांपर्यंत गेले.
तर रिलायन्स जिओबरोबर दूरसंचार मनोऱ्यासाठी भागीदारी करणाऱ्या जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरचा समभागही ५ टक्क्यांनी उंचावला. कंपनीला दिवसअखेर ४.९८ टक्के अधिक भाव मिळत तो ३.१६ रुपयांवर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजार दफ्तरी तो अधिक प्रमाणात, ३.३९ टक्क्यांनी वधारला. येथे तो ३.०५ रुपयांवर बंद झाला.