छोटय़ा घरांच्या निर्मितीसह गृहनिर्मिती क्षेत्रात उतरणाऱ्या टाटा हाऊसिंगने आता निवृत्तांसाठीही घरे तयार करण्याचा विडा उचलला आहे. कंपनी याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठीचे १३ प्रकल्प साकार करण्याच्या तयारीत आहे. येत्या पाच वर्षांत यासाठी १,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
टाटा समूहातील या कंपनीने बंगळुरूत रिवा रेसिडेन्सी हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प साकारला असून ज्येष्ठांसाठी आणखी आठ शहरांमध्ये कार्य करण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रोतिन बॅनर्जी यांनी सोमवारी नवी दिल्लीत केली.
२०१८ पर्यंत १,००० ते १,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून याअंतर्गत देशातील प्रमुख ८ शहरांमध्ये विविध १३ निवासी प्रकल्प तयार करण्यात येतील; ५५ वर्षांवरील व्यक्ती जवळपास २,००० घरांमध्ये राहू शकतील, असेही बॅनर्जी म्हणाले. निवृत्तांसाठीच्या घरांची भारतीय बाजारपेठ ही ४,००० कोटी रुपयांची असून येत्या चार वर्षांत त्यातील २५ टक्के बाजारपेठ कंपनीमार्फत काबीज करण्यात येईल, असा दावाही त्यांनी केला.
ज्येष्ठांची तयार होणारी घरे पुणे, मुंबईसह अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, नवी दिल्ली परिसर (एनसीआर) येथे असतील. बंगळुरूतील घरांसाठी आरोग्य सुविधांकरिता टाटा हाऊसिंगने अपोलोबरोबर तर वित्त सेवांसाठी टाटा कॅपिटल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व अॅक्सिस बँकेबरोबर सहकार्य करार केला आहे.
वार्षिक ७५ ते ८० टक्केव्यवसाय वाढ नोंदविणाऱ्या टाटा हाऊसिंगमार्फत सध्या ७ कोटी चौरस फूट विकास कामांचा धडाका सुरू असून १.९ कोटी चौरस फूट जागेचे काम प्रतीक्षेत आहे. मालदीव, श्रीलंका तसेच अन्य दक्षिण आशियाई देशांमध्ये कंपनीचे अस्तित्व आहे.
* ८ शहरे, १३ प्रकल्प, २,००० निवास
* शहरांमध्ये मुंबई, पुण्याचा समावेश
* चार वर्षांसाठी १,२०० कोटींची गुंतवणूक
भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या : ९.८० कोटी (६० वषरंपेक्षा अधिक)
२०३० पर्यंत ६० वर्षांवरील व्यक्तींचे प्रमाण : १९.६० कोटी होण्याचा अंदाज
निवृत्तीधारकांच्या घरांची बाजारपेठ २०१८ पर्यंत : ४,००० कोटी रुपये होणार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा