ई-व्यापार चढाओढीत सामील होत टाटा हाऊसिंगने गुगल ऑनलाइन शॉपिंग फेस्टिवलदरम्यान राबविलेल्या उपक्रमात १३० कोटी रुपयांच्या मालमत्तांचे नोंदणी व्यवहार अवघ्या तीन दिवसांत करून दाखविले. या प्रयोगात २०० घरांच्या विक्रीचे व्यवहार पार पडले आहेत.
भारतीय ई-कॉमर्स बाजारपेठेतील स्पर्धा तीव्र होत असतानाच टाटा समूहातील गृहनिर्माण क्षेत्रातील कंपनीनेही या क्षेत्रात उडी घेतली. यानुसार गुगल या आघाडीच्या संकेतस्थळाने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठावर टाटा हाऊसिंगने सलग तीन दिवस आपल्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांची विक्री सुरू ठेवली. यामध्ये कंपनीच्या माफक दरातील ते आलिशान अशा विविध २०० घरांची विक्री झाली. या माध्यमातून कंपनीने १३० कोटी रुपयांचा नोंदणी व्यवहार नोंदविल्याचे स्पष्ट झाले आहे. टाटा हाऊसिंगबरोबरच पूर्वाकरा, महिंद्र लाईफस्पेस, एचडीएफसी रिएल्टी यांनीही या उपक्रमात भाग घेतला. यानंतर कंपनीने स्वत:च्या व्यासपीठावर तिच्या विविध प्रकल्पांची नोंदणी व विक्री करण्याची प्रक्रियाही राबविली होती. ठरावीक रकमेत कंपनीच्या मुंबई, पुणे ते बंगळुरु येथील घरांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी माहिती तंत्रज्ञानाच्या व्यासपीठावर ४० टक्क्य़ांपर्यंतचे व्यवहार होत असल्याचा दावा यानिमित्ताने टाटा हाऊसिंगचे व्यवस्थापकीय संचालक ब्रोतिन बॅनर्जी यांनी केला होता.

Story img Loader