टाटा समूहाच्या ताब्यात असलेल्या ब्रिटनच्या जग्वार लॅण्ड रोव्हरचा त्या देशाबाहेरील पहिला वाहन उत्पादन प्रकल्प चीनमध्ये सुरू झाला असून यासाठी कंपनीने १.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. टाटा समूहाने चीनच्या बाजारपेठेमध्ये वाहनांच्या विपणनामार्फत यापूर्वीच अस्तित्व निर्माण केले आहे. आता वाहनांचे प्रत्यक्ष उत्पादनही येथूनच होईल.
टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा व विद्यमान अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या उपस्थितीत या वेळी कंपनीच्या रेन्ज रोव्हर इव्हॉक या एसयूव्हीचे उत्पादन घेण्यात आले. कंपनी येत्या दोन वर्षांत येथून जग्वार तसेच लॅण्ड रोव्हरची विविध उत्पादनेही घेईल. विविध ३००हून अधिक रोबोच्या साहाय्याने येथे वाहन उत्पादन घेतले जाणार आहे.
चीनच्या चेरी ऑटोमोबाइल कंपनीच्या भागीदारीत हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून या प्रकल्पाची वाहन उत्पादन क्षमता वार्षिक १.३० लाख वाहने आहे. उत्तर शांघायमधील चांग्शु आर्थिक विकास क्षेत्रात सुमारे ४ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर हा प्रकल्प आहे. दोन वर्षांपूर्वीच या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती.
आलिशान वाहन श्रेणीतील लॅण्ड रोव्हर ही नाममुद्रा चीनमध्ये वेगाने वाढत आहे. त्यामुळेच टाटा समूहाने चार वर्षांपूर्वीच तेथे विपणन साखळी सुरू केली. आता प्रत्यक्ष वाहन उत्पादन घेत कंपनीने ही बाजारपेठ महत्त्वाची असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. कंपनीने यानिमित्ताने नव्या प्रकल्पापोटी विक्रीत ३० टक्के वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
जगातील सर्वात मोठी वाहन बाजारपेठ म्हणून गणल्या जाणाऱ्या चीनमध्ये वर्षांला २.७ कोटी वाहने विकली जातात. तर प्रत्येक पाच वाहनांमागे एक इव्हॉक येथे धावत असते, असे चित्र आहे. गेल्या वित्तीय वर्षांत कंपनीने एक लाखांहून अधिक वाहने येथे विकली आहेत. कंपनीचे ब्रिटनमध्ये तीन वाहन उत्पादन प्रकल्प आहेत.
टाटा समूहाची चीनमध्ये मुसंडी
टाटा समूहाच्या ताब्यात असलेल्या ब्रिटनच्या जग्वार लॅण्ड रोव्हरचा त्या देशाबाहेरील पहिला वाहन उत्पादन प्रकल्प चीनमध्ये सुरू झाला असून यासाठी कंपनीने १.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
First published on: 22-10-2014 at 12:33 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata jaguar land rover opens first foreign manufacturing unit in china