सलग तिसऱ्या तिमाहीत रोडावणारी वाहन विक्री संख्या पाहता आगामी प्रवास अधिक प्रगतीपथक बनण्यासाठी टाटा मोटर्सने नव्या मोहिमांचा शुभारंभ करताना एकाच वेळी एकदम आठ प्रवासी वाहने सादर करण्याचा नवा पायंडा भारतीय वाहननिर्मिती क्षेत्रात घालून दिला. टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांच्या ‘मिशन २०२०’ धोरणांतर्गत ‘होरायझनेक्स्ट’ या मोहिमेचा प्रारंभ बुधवारी कंपनीच्या पुण्यानजीकच्या पिंपरी येथील प्रकल्पात झाला.
आठ विविध प्रकारातील पाच वाहने कंपनीने बुधवारी कंपनीच्या पिंपरी (पुणे) येथील प्रकल्पस्थळी सादर केली. यामध्ये नॅनो, इंडिका, इंडिगो, सुमो आणि सफारी या वाहनांचा समावेश आहे. नॅनो, इंडिगो आणि सुमो लगेचच उपलब्ध होणार असून उर्वरित वाहने सप्टेंबपर्यंत बाजारात येतील. नव्या ईआर ४ इंजिन आणि केबलद्वारे चलन होणारे गेअर तसेच अधिक मजबूत बफर ही नव्या वाहनांची वैशिष्टय़े आहेत. याच श्रेणीतील आणखी वाहने येत्या दोन महिन्यात बाजारात येणार आहेत. त्यामध्ये सीएनजीवरील नॅनोचाही समावेश आहे.
संथ अर्थव्यवस्थेचा परिणाम देशातील वाहननिर्मिती क्षेत्रावरही झाल्याचे नमूद करत स्लिम यांनी कंपनीदेखील स्पर्धेत कमी पडल्याचे कबूल केले. यासाठीच येत्या कालावधीत ‘होरायझनेक्स्ट’अंतर्गत अधिकाधिक व संशोधनपर विकसित वाहने सादर करण्याचे उद्दिष्ट त्यांनी यावेळी जाहीर केले. गुणवत्ता, सुरक्षितता आणि ग्राहक या मुद्यांवर भर देत कंपनी नव्या वाहनांची निर्मिती कायम ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कंपनी गेल्या वर्षांइतकीच गुंतवणूक एकूण आर्थिक वर्षांतही करणार आहे. पैकी १,६०० कोटी रुपये हे प्रवासी कार विभागावर तर १,४०० कोटी रुपये हे वाणिज्य वापरावरील वाहननिर्मितीसाठी गुंतविण्यात येणार आहेत. टाटा मोटर्सने गेल्या आर्थिक वर्षांत वाहन विभागासाठी ३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
कंपनी डिसेंबर २०१३ अखेपर्यंत देशातील १०० शहरांमध्ये १५० विक्री दालने सुरू करणार असून पैकी मोठय़ा शहरातील दालने ही कंपनीच्या स्वत:च्या मालकीची असतील, असेही स्लिम म्हणाले. टाटा मोटर्सच्या ग्राहकांसाठी येत्या दोन आठवडय़ात ११ विविध नव्या सेवाही सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader