कॉम्पॅक्ट, एसयूव्हीमुळे वाहनचालकांच्या पसंतीक्रमातून घसरत असलेल्या ‘हॅचबॅक’ श्रेणीतील बाजारहिश्श्यावर पकड मिळविण्याचा प्रयत्न टाटा मोटर्सने तिच्या नव्या ‘बोल्ट’द्वारे केला आहे. ‘होराझनेक्स्ट’ प्रसार मोहिम व ‘रेव्हट्रॉन’ इंजिनच्या जोरावर कंपनीने बहुपयोगी ‘बोल्ट’ गुरुवारी मुंबईत सादर केली.
स्पोर्ट, इको व सिटी अशा भिन्न वातावरणाचा एकाच वाहनाद्वारे अनुभव देण्याचा यत्न या नव्या बोल्टने देऊ केला आहे.
पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही इंधन प्रकारातील या वाहनामध्ये माहिती तंत्रज्ञानाची जोड असलेल्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याने तिची किंमत किमान ४.६५ लाख रुपयांपासून पुढे आहे.
हॅचबॅक या श्रेणीत आतापर्यंत देण्यात न येणाऱ्या उच्च सुविधांची जोड प्रथमच बोल्टच्या माध्यमातून उपलब्ध आहे. चार प्रकार व पाच रंगांमध्ये नवी बोल्ट शुक्रवारपासूनच देशभरातील ४५० दालनांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.
कारमध्ये समोरच्या बाजुला दोन एअर बॅग, टच कंट्रोल एसी, एसडी कार्डद्वारे ऑडिओ-व्हिडिओची सुविधा, नकाशे व संदेश सूचनाफलकही देण्यात आले आहेत.  टाटा मोटर्सचा हॅचबॅक श्रेणीतील बाजारहिस्सा ४ ते ४.५ टक्क्य़ांपर्यंत आहे. या वाहन प्रकारात नवी झेस्ट सप्टेंबर २०१४ मध्ये वर्षी सादर करण्यात आली होती. मात्र तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. याच श्रेणीतील अत्याधुनिकतेची जोड असलेल्या नव्या कारला मात्र तीन महिन्यात उत्तम प्रतिसाद मिळून ही बाजारपेठ १० टक्क्य़ांपर्यंत गाठली जाईल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे. २०१५ मध्ये बोल्टच्या ४८ हजार विक्रीचे उद्दिष्ट यावेळी कंपनीच्या प्रवासी वाहन व्यवसाय विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश वाघ यांनी जारी केले. झेस्टही येत्या सहा महिन्यात मागणीबाबत पूर्वपदावर येईल, असेही यावेळी नमूद करण्यात आले. या श्रेणीप्रकारात सध्या इंडिका व व्हिस्टा ही दोन वाहने सध्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा