टाटा मोटर्स कंपनीची नवी ‘झिका’ नावाची मोटार नव्या वर्षांमध्ये बाजारात दाखल होणार आहे. छोटे कुटुंब व तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून ही मोटार तयार करण्यात आली असल्याचे कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रकल्प व्यवस्थापक गिरीश वाघ यांनी सांगितले.
गुजरातमध्ये उत्पादन सुरू असलेल्या या मोटारीबाबत शुक्रवारी कंपनीच्या वतीने माहिती देण्यात आली. वाघ यांच्यासह उपाध्यक्ष (विपणन) एस. एन. बर्मन, डिझाइन विभागाचे प्रमुख प्रताप बोस यांनी मोटारीबाबत माहिती दिली. नवी ‘झिका’ या मोटारीची बाह्य़ व अंतर्गत रचना आकर्षक व उपयुक्त ठेवण्याकडे लक्ष देण्यात आले आहे. पेट्रोल व डिझेल या दोन्ही इंधनांवर ही मोटार उपलब्ध होणार आहे.
छोटे कुटुंब व प्रामुख्याने युवक वर्ग डोळ्यासमोर ठेवून मोटारीची रचना व अंतर्गत सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी करण्याकडेही लक्ष देण्यात आले आहे. मोटारीत उच्च दर्जाची म्युझिक सिस्टीम देण्यात आली असून, ती तरुणाईच्या पसंतीस पडेल, असा विश्वास कंपनीच्या वतीने व्यक्त करण्यात आला. टाटा मोटर्सकडून दरवर्षी दोन नव्या मोटारी बाजारात दाखल करण्यात येणार आहेत. नव्या वर्षांची सुरुवात ‘झिका’ मोटारीने होणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीतील निर्णयामुळे उत्पादनांना फटका
प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने दोन हजार सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या वाहनांची नोंदणी थांबविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिले आहेत. दिल्ली ही वाहनांची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या निर्णयाचा फटका टाटा मोटार्स कंपनीला फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत टाटा मोटर्सचे प्रकल्प व्यवस्थापक गिरीश वाघ म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे टाटा मोटर्सच्या स्टॉर्म, एरिया, सुमो या वाहनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, हा निर्णय केवळ दिल्लीसाठी मर्यादित असल्याने या वाहनांचे उत्पादन सुरूच राहील.’’

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors to launch new hatchback zica in