शेअर मार्केटमध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळत असतात. पण यामध्ये देखील असे काही स्टॉक आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना उत्तमोत्तम परतावे देत आहेत. गेल्या वर्षी बाजारात लिस्ट झालेल्या १५ आयपीओनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावे दिले आहेत. अशाचप्रकारे टाटा ग्रुपच्या टाटा टेलीसर्विसेज महाराष्ट्र लिमिटेड या स्टॉकने एका महिन्यातच आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. मागच्या सहा महिन्याची कामगिरी पाहता या स्टॉकने गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा चांगला परतावा दिल्याचं पाहायला मिळालं आहे.
टीटीएमएलचा शेअर यावेळी २०६ रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. मागच्याच महिन्यात या शेअरची किंमत १२६ रुपये इतकी होती. एका महिन्यात या शेअरची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे.
एका वर्षात २६ पट नफा
एका वर्षात हा स्टॉक ७.९० रुपयांवरून २०६.३५ रुपयांवर पोहोचला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज याची किंमत २६ लाखांहून अधिक झाली असेल. एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याची किंमत ३.८१ लाख रुपये इतकी झाली असेल. याचाच अर्थ सहा महिन्यात ३ पट नफा झाला.
टीटीएमएल ही टाटा टेलिसर्व्हिसेसची सब्सिडिअरी कंपनी आहे. तसेच ही आपल्या सेगमेंट मधील आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना व्हॉइस आणि डेटा सर्व्हिसेस प्रदान करते. टाटा टेली बिजनेस सर्व्हिसेसने नुकतंच बिजनेससाठी देशातील पहिली स्मार्ट इंटरनेट लीज लाईन सुरु केली होती. याच्या मदतीने अतिशय कमी खर्चात हाई स्पीड इंटरनेट नेटवर्क सुविधा दिली जाते. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही क्लाउड आधारित अशी प्रणाली आहे ज्याद्वारे डेटा सुरक्षित राखला जातो.