* पहिल्या तिमाहीत प्रत्यक्ष करांमध्ये ६.४ टक्क्यांची भर
* कंपन्यांचा अग्रिम कर, संपत्ती करांत मात्र उत्तम वाढ
केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षांसाठी निश्चित केलेले प्रत्यक्ष करसंकलनाचे उद्दिष्ट पूर्ण होणे कठीण असल्याचे चित्र आताच स्पष्ट होत आहे. एप्रिल ते जून या तिमाहीतील निव्वळ प्रत्यक्ष करसंकलनात केवळ ६.४४ टक्केच वाढ झाल्याने हे तुटीचे संकट आणखीच घोंघावण्याची भीती निर्माण झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीनंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागल्यास संकलनाचे अपेक्षित उद्दिष्ट राखले जाण्याची चिन्हे आहेत.
सरकारने २०१३-१४ वर्षांसाठी ६.६८ लाख कोटी रुपयांचे प्रत्यक्ष करसंकलन उद्दिष्ट राखले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत ते ५.६५ लाख कोटी रुपये होते. निर्धारित वेग गाठावयाचा असेल तर प्रत्येक तिमाहीत भरघोस करसंकलन झाले पाहिजे. मात्र यंदाच्या पहिल्या तिमाहीत ८९,७०५ कोटी रुपयांचे निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन झाले आहे. ते गेल्या आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीतील ८४,२४७ कोटी रुपयांपेक्षा ६.४४ टक्क्यांनी अधिक नोंदविले गेले असले तरी अपेक्षित उद्दिष्टापेक्षा ते लांब आहे.
एप्रिल ते जून २०१३ दरम्यान ढोबळ करसंकलन दुहेरी आकडय़ात वधारले असून ते आधीच्या १,११,१८३ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा १,२३,९९३ कोटी रुपये झाले आहे. यामध्ये कंपन्यांमार्फत भरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष कराचा हिस्सा ७.८२ टक्क्यांनी (७६,११५ कोटी रुपये) वाढला आहे. भांडवली बाजारातील उलाढाल कराच्या (एसटीटी) माध्यमातून ९२६ कोटी रुपये जमा झाले आहेत. हा कर १ जुलै २०१३ पासून वाढविण्यात आला असून येत्या कालावधीत यापोटीचा करही अधिक जमा होण्याची शक्यता आहे. तर संपत्ती करही तब्बल ५० टक्क्यांनी वाढला आहे. तो आधीच्या ३२ कोटी रुपयांवरून ४८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या तिमाहीत प्राप्तिकरही १८.५३ टक्क्यांनी वाढला आहे.
सरकारने चालू आर्थिक वर्षांसाठी अप्रत्यक्ष करसंकलनाचे उद्दिष्ट ५.६५ लाख कोटी रुपये (गेल्या वर्षांतील प्रत्यक्ष करसंकलनाएवढेच) निश्चित केले आहे. पैकी पहिल्या तिमाहीत ते ३.८ टक्क्यांनी वाढले आहे. एकूण ७१,३७९ कोटी रुपयांच्या अप्रत्यक्ष कर संकलनामध्ये सीमाशुल्क सर्वाधिक म्हणजे २८,०८० कोटी रुपये जमा झाले आहे. तर उत्पादन व सेवा कर संकलन अनुक्रमे २३,५८९ व १९,७१० कोटी रुपये राहिले आहे.

Story img Loader