मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा नुकताच घेतलेला निर्णय महागाई दर आटोक्यात राखण्यासाठी मदतकारक ठरणार आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी प्रतिपादन केले.
सध्या देशात अन्नधान्य महागाईचा दर नियंत्रणात आहे. तरी एकंदरीत महागाई दराच्या भडक्याची जोखीम अजूनही कायम आहे. देशातील महागाई दराचा धोका हा प्रामुख्याने पुरवठ्याच्या अंगाने वाढला आहे. मात्र त्याची सरकारने वेळीच दखल घेऊन हस्तक्षेप केला. विशेषत: डाळी आणि खाद्यतेलाच्या संदर्भात आणि आता अगदी अलीकडे पेट्रोल आणि डिझेलवरील कर भार कमी करून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून मदत मिळाली आहे, असे दास म्हणाले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर वाढले आहेत. परिणामी, इंधन घटकामुळे महागाई दर वाढला आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. मात्र मध्यवर्ती बँक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आभासी चलनातील व्यवहारांबाबत सतर्कतेचा इशारा
अर्थव्यवस्था आणि देशाच्या आर्थिक स्थिरतेच्या दृष्टिकोनातून आभासी चलन (क्रिप्टोकरन्सी) अतिशय गंभीर चिंतेचा विषय आहे. त्यावर देशाच्या मध्यवर्ती बँक या नात्याने सरकारला काही सूचना केल्या असल्याचे गव्हर्नर दास यांनी सांगितले. सध्या देशात आभासी चलनाची खरेदी विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या वाढते आहे. मात्र ती नेमकी किती आहे हे सध्या सांगता येणार नाही. तरी अशा व्यवहारांना आणि आभासी चलनाला मान्यता देण्याबाबत निर्णय केंद्र सरकारच घेऊ शकेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.