गृहनिर्माण व नगरविकासाला वाहिलेली आणि स्थापनेपासून गेल्या ४२ वर्षांत निरंतर नफा कमावणारी सरकारची ‘मिनीरत्न’ कंपनी ‘हाऊसिंग अॅण्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.’ अर्थात ‘हडको’ने गुंतवणूकदारांना किमान ७.८४% ते कमाल ८.०१% व्याजरूपी संपूर्ण कर-मुक्त परतावा देणारे अनुक्रमे १० वर्षे आणि १५ वर्षे मुदतीच्या रोखेविक्रीची घोषणा केली आहे. चालू वर्षांतील ही रूरल इलेक्ट्रिकल कॉर्पोरेशन, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि आयआयएफसीएल यांच्यानंतर दाखल झालेली चौथी परंतु तुलनेने सरस परतावा देऊ पाहणारी रोखे विक्री आहे.
या रोखेविक्रीतून पहिल्या टप्प्यात ७५० कोटी रुपये आणि शक्य झाल्यास रु. ५००० कोटींपर्यंत निधी ‘हडको’कडून उभारला जाईल. ही रोखेविक्री येत्या ९ जानेवारीपासून खुली होत असून, २२ जानेवारी रोजी समाप्त होईल.
उच्च कोटीचे करांचे दायित्व असलेल्या उच्च-उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांसाठी प्राप्तिकरांतून सवलत मिळविण्याची ‘हडको’चे रोखे म्हणजे सघ्या उपलब्ध झालेली शेवटची संधी असल्याचा शेरा अनेक नामांकित वित्तसंस्था व दलालपेढय़ांनी या रोखेविक्री दिला आहे. ‘केअर’ आणि ‘आयआरआरपीएल’ या पतमानांकन संस्थांनी या रोखेविक्रीला ‘एए+’ असे मानांकन बहाल केले आहे. करवजावटीचा पैलू जमेस धरल्यास या रोख्यांमधील गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा ११.५ टक्क्यांचा घरात जाणारा ठरतो.
अलिकडच्या रोखे विक्री व परतावा
१० वर्षे १५ वर्षे
आरईसी (३,००० कोटी) ७.२२% ७.३४%
पीएफसी (५,५९० कोटी) ७.६९% ७.८६%
हडको (५,००० कोटी) ७.८४% ८.०१%
* परताव्याचा दर रु. १० लाखांपेक्षा अधिक गुंतवणुकीवर