करदात्यांना भारतात त्यांचे विवरणपत्र भरताना आता विविध बँक खात्यांची माहिती द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर विदेश सफरीवर जाणार असल्यास अथवा जाऊन आल्यावर त्याची सविस्तर नोंद या प्रक्रियेत करणे बंधनकारक ठरणार आहे.
नवीन प्राप्तिकर परताव्याचा अर्ज सादर करताना कर विभागाने त्यात बदल केले आहेत. सध्याच्या अर्जाच्या रचनेत काही अतिरिक्त मुद्दय़ांचा समावेश करण्यात आला आहे. काळ्या पैशाचा स्रोत शोधण्यासाठी ही उपाययोजना केली गेल्याचे सांगण्यात येते.
नव्या अर्जात आधार क्रमांक नोंद करण्यासाठी रकानाही देण्यात आला आहे.
प्राप्तिकर परतावाविषयक आयटीआर-१ आणि आयटीआर-२ सह नव्या प्राप्तिकर विवरण अर्जात बँक खात्यांची संख्या व ३१ मार्चपर्यंतचे शेवटची शिल्लक रक्कम दाखवावी लागेल. बँक खात्यांची माहिती देताना बँकेचे नाव, बँकेचा पत्ता, खाते क्रमांक, आयएफएससी क्रमांक तसेच संयुक्त खाते याची नोंद करावी लागणार आहे.
विदेश प्रवासाची नोंद करण्यासाठी करदात्याला पारपत्र क्रमांक, ते जारी केल्याचे ठिकाण, सफर केलेल्या देशांची नावे, प्रवासाची संख्या याची माहिती नव्या प्राप्तिकर विवरणपत्रात द्यावी लागेल. त्याचबरोबर अशा विदेश सफरींसाठीच्या खर्चाचा स्रोतही नमूद करावा लागेल.
विदेशातील सर्व मालमत्ता व भारताबाहेर उत्पन्नाचे स्रोत नमूद करण्याचे बंधन प्राप्तिकर विभागाने गेल्या वर्षीच टाकले होते. आता नव्या प्रक्रियेत विदेश सफरीचे विस्तृत विवेचन करदात्यांना करावे लागणार आहे.

Story img Loader