चार वर्षांच्या कालावधीनंतर महिंद्र समूहातील दोन स्वतंत्र कंपन्यांचे एकत्रीकरण अखेर पूर्ण झाले आहे. महिंद्र सत्यमचे (पूर्वाश्रमीची सत्यम कॉम्प्युटर्स) टेक महिंद्रमध्ये विलीनीकरण झाल्याने ती देशातील पाचवी मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी बनून पुढे आली आहे. नवीन बोधचिन्ह व उद्यमप्रतिमेसह पुढे आलेल्या नव्या संयुक्त कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून मिलिंद कुलकर्णी यांच्या नावाची घोषणा टेक महिंद्रचे कार्यकारी उपाध्यक्ष विनीत नायर यांनी केली. टेक महिंद्रने २०१५ पर्यंत सध्यापेक्षा दुपटीने म्हणजे ५ अब्ज डॉलरचा महसूल मिळविणे अपेक्षिले जात आहे.
उभय कंपन्यांच्या संचालक मंडळाने मार्च २०१२ मध्येच या विलीनीकरणाला मंजुरी दिली होती. मुंबई उच्च न्यायालयानेही या व्यवहाराला मान्यता दिल्यानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा होती. या न्यायालयानेही ११ जून रोजी मंजुरी दिली. टेक महिंद्रचे मुंबई तर महिंद्र सत्यमचे हैदराबाद येथे मुख्यालय असल्याने याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर विलीनीकरण अस्तित्वात आले. या घडामोडी सुरू असल्याने कंपनीने ३१ जुलै रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द केली आहे. तसेच आता स्वतंत्र बैठक घेण्याची आवश्यकता नसल्याने नव्या सभेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
सत्यम कॉम्प्युटर्सचे अनेक वर्षे ताळेबंद फुगविण्यात आल्याची कबुली देणाऱ्या संस्थापक अध्यक्ष बी. रामलिंगा राजू यांच्या जानेवारी २००९ मधील कॉर्पोरेट विश्वातील गहजबानंतर टेक महिंद्रने लार्सन अ‍ॅन्ड टुब्रोला मात देत खुल्या लिलावात वरचढ बोली लावत, ४२.७ टक्के हिस्सा खरेदी करून सत्यमवर ताबा मिळविला होता. त्यानंतर महिंद्र सत्यम नामकरण करून कंपनीचा व्यवसाय महिंद्र समूहाच्या देखरेखीखाली व सी. पी. गुरनानी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. दरम्यान दोन्ही कंपन्यांचे वित्तीय निष्कर्षही स्वतंत्र जाहीर होत होते. महिंद्र सत्यमने मार्च २०१३ अखेरच्या आर्थिक वर्षांत ९.०१ अब्ज रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. टेक महिंद्रची मुख्य ग्राहक व भागीदार कंपनी ब्रिटिश टेलिकॉमही समूहातून बाहेर पडली आहे. अमेरिकासारख्या देशातून मोठय़ा प्रमाणात व्यवसाय मिळणाऱ्या महिंद्र सत्यमने अनेक ग्राहकही गमावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्यम अखेर नामशेष..!
एप्रिल २००९ मधील संपादनातून टेक महिंद्रने घोटाळेग्रस्त सत्यम कॉम्प्युटरला ‘महिंद्र सत्यम’ या रूपाने नवीन जीवन बहाल केले. या ताबा प्रक्रियेनंतर महिंद्र सत्यमने पहिल्याच वर्षी तिच्या भागधारकांना ३० टक्के लाभांशही दिला. विलिनीकृत संयुक्त कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या आता ८४,००० झाली असून विविध ४६ देशांमध्ये तिचे ५४० ग्राहक आहेत. भारतातील ११ ठिकाणांसह विदेशातील १५ ठिकाणी कंपनीचे अस्तित्व राहणार आहे. विलिनीकरणानंतर ‘सत्यम’ आपले अस्तित्वच गमावून बसेल. महिंद्र सत्यम आता टेक महिंद्र या नावानेच कार्यरत होईल. महिंद्र सत्यमच्या भागधारकांना त्यांच्याकडील प्रत्येक ८.५ समभागामागे टेक महिंद्रचा एक समभाग मिळेल. सत्यम अखेर नामशेष होऊन काळाच्या पडद्याआड गेली, परंतु तिच्या ऱ्हासास कारणीभूत राजू बंधूं जरी तुरुंगात असले तरी खटला मात्र अद्याप पूर्ण झालेला नाही.

वचनपूर्ती
सत्यम कॉम्प्युटर्स घेताना २००९ मध्ये गुंतवणूकदार, भागधारकांना दिलेले वचन आम्ही पूर्ण केले आहे. संयुक्तरीत्या आम्ही आता देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मातब्बर स्पर्धक बनलो आहोत. भविष्यात आम्ही आणखी वेगवान प्रगती करू!
’ आनंद महिंद्र,
अध्यक्ष, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र समूह

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tech mahindra completes satyam merger becomes 5th biggest it firm
Show comments