स्थापनेपूर्वीच बाहेर पडलेली तिसरी कंपनी
नव्या बँक व्यवसायासाठी परवाना मिळूनही त्याबाबतची अनुत्सुकता महिंद्र समूहातील टेक महिंद्रनेही दाखविली आहे. देशात पेमेंट बँक व्यवसाय उभारायची इच्छा नाही, असे कंपनीने मंगळवारी स्पष्ट केले.
या माध्यमातून बँक स्थापन करण्यापूर्वीच माघार घेणारा टेक महिंद्र हा तिसरा गट ठरला आहे. यापूर्वी चोलामंडलम समूह, दिलीप संघवी-आयडीएफसी बँक-टेलिनॉर यांनीही अशीच माघार घेतली होती.
टेक महिंद्रला ऑगस्ट २०१५ मध्ये रिझव्र्ह बँकेने पेमेंट बँक स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. या नव्या व्यवसायात तिचे पेटीएम-रिलायन्स इंडस्ट्रीज-एअरटेल हे भागीदार होते. टेक महिंद्रच्या अन्य दोन भागीदारांनी मात्र बँक व्यवसायाच्या पुढील प्रवासाबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही.
नवीन बँक उभारणीबाबत तूर्त विचार करायचा नाही, असे कंपनीच्या संचालक मंडळाने एकमताने ठरविल्याचे टेक महिंद्रने मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे. या व्यवसायातील व्यवहारांची संख्या व संभाव्य नफा पाहता सध्या स्पर्धेत न उतरलेलेच बरे, असे टेक महिंद्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सी. पी. गुरनानी यांनी सांगितले.
४१ अर्जदारांपैकी टेक महिंद्रबरोबर विविध ११ कंपन्या, गटांनी रिझव्र्ह बँकेने गेल्या वर्षी नव्या पेमेंट बँकेसाठी परवाने दिले होते. तेव्हापासून दीड वर्षांत त्यांना बँक स्थापन करणे गरजेचे आहे. नव्या बँक व्यवसायासाठी दिलीप संघवी यांनी माघार घेतल्यानंतर रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली होती. माघार घेणाऱ्यांची वाढती संख्या ही चिंताजनक असल्याचे ते मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते.