बाजार तंत्रकल
तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..
गेल्या आठवडय़ातील लेखाचे शीर्षक ‘निर्देशांक वळणिबदूवर’ अगदी समर्पक ठरले. सेन्सेक्सवर ३१,५००/ निफ्टीवर ९,७०० हा अवघड अडथळा असल्याचे नमूद करून, निर्देशांकांनी या स्तराला सकारात्मक वरचा छेद दिल्यास पहिले वरचे उद्दिष्ट ३२,०००/ ९,८५० असे असेल, असे या लेखात सांगण्यात आले होते. निर्देशांकांचे हे पहिले वरचे उद्दिष्ट गुरुवारी साध्य झाले. याच स्तरावर निर्देशांकांनी साप्ताहिक बंदही नोंदविला आहे.
पुढील आठवडा कसा?
शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स- ३२,०२०.७५ निफ्टी- ९,८८६.३५
पुढील आठवडय़ातही निर्देशांक जर सातत्याने ३१,८०० ते ३१,८००/ ९,८०० ते ९,८५०चा स्तर टिकवण्यात यशस्वी ठरले तर निर्देशांक मुसंडी मारून ३२,५००/ १०,०००च्या विक्रमी उच्चांकाला गवसणी घालेल. ही तेजीची धारणा झाली.
पण जर का पुढील आठवडय़ात निर्देशांक ३१,८००/ ९,८००च्या खाली गेल्यास व त्या पातळीवर सातत्याने टिकल्यास निर्देशांक ३१,५००/ ९,७०० पर्यंत खाली येऊ शकतील. तथापि ही तेजीच्या वातावरणातील संक्षिप्त घसरण असेल.
सोने किमतीचा आढावा : सोन्याचा आढावा : सोन्याचा आणि निर्देशांकांचा परस्परसंबंध हा व्यस्त स्वरूपाचा असतो याचा प्रत्यय आपण पुन्हा घेत आहोत. निर्देशांक नवनवीन उच्चांक मारत असताना सोन्याचे भाव मात्र मंदीच्या गत्रेत जात आहेत. सोन्याची ‘कल निर्धारण पातळी’ ही २८,५०० आहे व आताच्या घडीला सोन्याचा भाव हा २८,०००च्या खाली आला आहे. येणाऱ्या दिवसांत सोन्याचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा २७,६०० ते २८,५०० असेल. २७,६०० खाली सोने सातत्याने टिकल्यास सोने २७,२५० पर्यंत खाली घसरू शकते (सोन्याचे भाव एमसीएक्सवरील व्यवहाराचे आहेत.)
लक्षवेधी समभाग..
एनआयआयटी लि.
शुक्रवारचा बंद भाव : ८८.५० रु.
एनआयआयटी लिमिटेडचा बाजारभाव हा २०० (८२.५०), १०० (८२), ५० (८७) या सर्व दिवसांच्या चलत् सरासरीवर बेतलेला आहे. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ८० ते ९२ आहे. रु. ९३ च्या पातळीवर शाश्वत दीर्घकालीन तेजी सुरू होऊन प्रथम वरचं उद्दिष्ट रु. १०३ ते १०५ असेल व रु. १२५ हे दीर्घकालीन उद्दिष्ट असेल. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला रु. ७८ चा स्टॉप लॉस ठेवावा.
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टॉप लॉस व इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
आशीष अरिवद ठाकूर – ashishthakur1966@gmail.com