तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..
गेल्या आठवडय़ात या स्तंभातून निफ्टी निर्देशांकाच्या अर्थात बाजाराच्या दशा आणि दिशेबाबत महत्त्वाचे निर्देश दिले होते. ‘‘येणाऱ्या दिवसांत ३१,८००/९,९५० या पातळ्यांना तेजी व मंदीवाल्यांच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्त्व असून बाजाराची ‘दिशा अथवा दशा’ या स्तरावरून ठरेल. तेजीच्या दृष्टिकोनातून निर्देशांक सातत्याने पाच दिवस ३१,८००/९,९५०च्या वर टिकल्यास रु. ३२,८८६/ १०,१५० या आधीच्या उच्चांकाला गवसणी घालेल व नंतर पुढचे लक्ष्य ३३,०००/ १०,३५० अशा ऐतिहासिक उच्चांकाचे असेल. बाजाराची दिशा ही अशी असेल.’’ काळाच्या कसोटीवर या पातळ्या तपासल्या गेल्या. गुरुवापर्यंत निर्देशांकानी ३१,८००/९,९५०चा स्तर तर राखलाच पण या काळात ३२,०००/१०,००० चा स्तर पार करण्यात वारंवार जो अडथळा येत होता तो गुरुवारी यशस्वीरीत्या पार करून आपली तेजीची दिशा स्पष्ट केली. शुक्रवारी तर अगोदरच्या निफ्टीने सत्रातील उच्चांकाला गवसणी घातली आणि दिवसअखेर निफ्टीने नवीन उच्चांकावर विश्राम घेतला.
या पाश्र्वभूमीवर पुढील आठवडय़ात निर्देशांकाची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.
शुक्रवारचा बंद भाव
सेन्सेक्स ३२,४३२.६९,
निफ्टी १०,१६७.४५
पुढील आठवडा हा सणासुदीचा असल्याने उत्साहाचे वातावरण असेल. एखाद्या संक्षिप्त घसरणीत निर्देशांक ३२,०००/१०,००० पर्यंत खाली आला व हा स्तर टिकवला जात असेल तर निर्देशांक पुन्हा ३२,८८६/१०,१५० व नंतर ३३,०००/१०,३५० ही वरची उद्दिष्टे असतील. (या काळात अमेरिका-उत्तर कोरियाचा युद्धज्वर नसावा ही अपेक्षा)
लक्षणीय समभाग
सिनेलाइन इंडिया लिमिटेड
शुक्रवारचा बंद भाव : रु. ९०.१५
सिनेलाइन इंडियाचा आजचा बाजारभाव हा २०० (७९), १०० (७८), ५० (८२) या सर्व दिवसांच्या चलत सरासरीवर बेतलेला आहे. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बँड) हा रु. ८२ ते ९८ असा आहे. रु. ९८च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन पहिले इच्छित उद्दिष्ट रु. ११० व नंतर रु. १२५ असे असेल. या दीर्घकालीन गुंतवणुकीला ७५ रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.
सोने किमतीचा आढावा
ल्ल गेल्या आठवडय़ातील विवेचनातील एक वाक्य होते – ‘‘सोन्याचा भाव सातत्याने रु. २९,३०० च्या वर टिकल्यास २९,५०० व नंतर २९,८०० ते ३०,१०० रुपये ही वरची उद्दिष्टे असतील.’’
रु. २९,८००चे हे इच्छित वरचे उद्दिष्ट सरलेल्या मंगळवारी १० ऑक्टोबरलाच गाठले गेले. पुढील आठवडा हा सणासुदीचा व सोने खरेदीचा असल्याने रु. ३०,१०० चा भाव दृष्टिपथात येईल. जोपर्यंत सोने रु. २९,३०० चा भाव टिकवण्यात यशस्वी ठरत आहे तोपर्यंत सोन्याची झळाळी कायम राहील. (सोन्याचे भाव ‘एमसीएक्स’वरील व्यवहारांवर आधारित)
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टॉप लॉस व इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
आशीष अरिवद ठाकूर
ashishthakur1966@gmail.com