येत्या वर्षांत संपुष्टात येणाऱ्या परवान्यासाठी नव्याने सादर करावयाच्या ध्वनिलहरी लिलावासाठीचे आधार मूल्य कमी नाही केले गेल्यास भविष्यात मोबाइल सेवेचे दर निम्म्याने वाढवावे लागतील, असा इशारा आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांनी दिला आहे.
भारती एअरटेल, व्होडाफोन, लूप मोबाइलसह अनेक कंपन्यांच्या ध्वनिलहरीचे सध्याचे परवाने २०१४ मध्ये संपत आहेत. नव्याने लिलाव प्रक्रियेतून त्यांना परवाने मिळवावे लागणार. मात्र या प्रक्रियेसाठी दूरसंचार प्राधिकरणाने आधार मूल्यात दरवाढ सूचित केली आहे. या कंपन्यांनी २००८ मध्ये परवान्यांसाठी भरलेल्या रकमेच्या तुलनेत नवी रक्कम ही ११ पट अधिक आहे.
नव्या परवान्यांसाठी आधार मूल्याचा वाढी दर पाहता व्यवसायात तग धरण्यासाठी ग्राहकांवर दरवाढीचा बोजा टाकावा लागेल, असे भारती एअरटेलने म्हटले आहे. परिणामी कॉल रेट, एसएमएस तसेच अन्य सेवांचे दर ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात, असेही तिने स्पष्ट केले आहे. भारती एअरटेलने ‘पीडब्ल्यूसी’बरोबर वर्षभरापूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार, कॉल दर २६ पैशांपर्यंत (प्रति मिनिट) वाढतील असा निष्कर्ष पुढे आला आहे.
गेल्या दोन वर्षांत कॉल रेट १०० टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या हे दर प्रति मिनिट ९० पैसै ते १.२० रुपयांदरम्यान आहेत. थ्रीजीसाठी देशपातळीवरील परवान्यासाठी ३,५०० कोटी रुपये शुल्क २०१० मध्ये निश्चित करण्यात आले होते. तर गेल्या वर्षी झालेल्या ५ मेगाहर्ट्झसाठीच्या परवान्याची आधार किंमत १४,००० कोटी रुपये होती.
प्रस्तावित वाढीव आधार मूल्याचा विपरीत परिणाम दूरसंचार कंपन्यांवर होणार असून मोबाइल ग्राहकांनाही प्रति मिनिट ५० पैसे अतिरिक्त मोजावे लागतील, असे मुंबईत सेवा देणाऱ्या लूप मोबाइलने म्हटले आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या व्होडाफोन कंपनीनेही ध्वनिलहरी परवान्यांचे आधार मूल्य ८४ टक्क्यांपर्यंत कमी करावे, असे सुचविले आहे.
अंबानी बंधूंची वेगळी चूल
वाढीव आधार मूल्याबाबत जवळपास सर्वच मोबाइल सेवा पुरवठादार एकत्र झाले असताना अंबानी बंधूंनी वेगळी चूल मांडली आहे. धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स तसेच थोरले बंधू मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने नव्या परवान्यांसाठी आधार मूल्य कपातीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. टेलिनॉरच्या टेलिविंग्जनेही २००१ मधील १,६५० कोटी रुपये आधार मूल्य कायम ठेवावे, असे सुचविले आहे.