रिझव्‍‌र्ह बँकेच्या दरकपातीचे ज्या शेअर बाजाराने  स्वागत केले तो बाजार आता वाणिज्य बँकांसाठी पुनर्रचित कर्जाबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने वाढविलेल्या मर्यादेबद्दल चिंतातूर बनला आहे. सप्ताहअखेर सलग दुसऱ्या दिवशी शतकी घसरणीने ‘सेन्सेक्स’ तीन आठवडय़ाच्या तळाला पोहोचला, तर निफ्टीने ६ हजाराची भावनात्मक पातळी तोडली.
कंपन्यांच्या तिमाही कामगिरीच्या जोरावर तेजीचे नवे क्षितिज गाठू पाहणाऱ्या निर्देशांकाला शुक्रवारी काही आघाडीच्या कंपन्यांच्या खराब तिमाही कामगिरीचाही अनुभव घ्यावा लागला. आज वित्तीय निकाल जाहीर करणाऱ्या भेल, भारतीसह बँक समभागांचे मूल्यही आज कमी झाले. सलग १२ तिमाहीत नफ्यात घसरण नोंदविणाऱ्या भारती एअरटेलचे समभाग मूल्य २.६२ टक्क्यांनी खालावले. भेलमधील नुकसानही एक टक्क्याच्या जवळपास होते. तर ‘सेन्सेक्स’मध्ये घसरणीत टाटा मोटर्स आघाडीवर दिसून आला. हा समभाग कालच्या तुलनेत ४.३६ टक्क्यांनी घसरला. याचबरोबर आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक यांचेही समभाग मूल्य दोन टक्क्यांपर्यंत खाली आले होते. ‘सेन्सेक्स’मधील ३० पैकी १८ समभाग घसरणीच्या यादीत होते. व्याजदराशी निगडित बांधकाम, वाहन, बँक क्षेत्रीय निर्देशांकातील घसरण ०.७९ ते १.१६ टक्क्यांपर्यंतची होती.

जेट तेज!
नरेश गोयल प्रवर्तित जेट एअरवेजने डिसेंबअखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत नफ्यात वाढ नोंदविली. कंपनीने यापूर्वी सलग तिमाहीगणिक आर्थिक नुकसान सोसले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०११ दरम्यान कंपनीने १०१.२२ कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. यंदाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने ८५ कोटी रुपयांचा नफा कमाविला आहे. या कालावधीत कंपनीचे उत्पन्नही आधीच्या ३,९३९.१६ कोटी रुपयांवरून ४,२०५.७७ कोटी रुपयांवर गेले आहे. (यापूर्वी याच क्षेत्रातील स्पाईसजेटनेही ३९.३ कोटी रुपयांच्या नुकसानानंतर १०२ कोटींचा नफा नोंदविला आहे.) दुबईस्थित इतिहाद ही विदेशी हवाई कंपनी जेटमधील २४ टक्के हिस्सा खरेदीच्या निर्णयाप्रत आल्याच्या चर्चेने कंपनीचे समभाग मू्ल्यही निरंतर विस्तारत आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात जेटचा शेअर उंचावला होता. इतिहाद आणि जेट या दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारमधील संबंधित मंत्र्यांबरोबरच्या भेटीगाठी शुक्रवारीही कायम ठेवल्या.

वित्तीय तूट रोखण्याच्या दिशेने आगामी कालावधीत सरकारची धोरणे आखली जातील. विकासदरात वाढ आणि विदेशी गुंतवणूक वाढविण्याच्या दिशेनेही दमदार पावले टाकली जात आहेत.
पी. चिदम्बरम
अर्थमंत्री

Story img Loader