ऐन सण-समारंभात सूट-सवलतींना भुलून ग्राहकांच्या उडय़ा पडणाऱ्या ई-कॉमर्स वेबस्थळांवरील खरेदी-विक्रीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या वस्तूंच्या उत्पादकांकडे किमती जास्त असताना संकेतस्थळ चालविणाऱ्या कंपन्या त्यांच्या किमती मोठय़ा प्रमाणात कशा कमी करू शकतात, असा सवाल करत व्यापाऱ्यांच्या संघाने संबंधित व्यवसाय आराखडय़ाच्या चौकशीची मागणी केली आहे; तसेच या प्रकरणात भारतीय स्पर्धा आयोगाचेही लक्ष वेधण्यात येणार आहे.
भारतीय ई-कॉमर्स व्यवसाय सध्या वेगात आहे. कंपन्यांमध्ये तर ग्राहक मिळविण्याची तीव्र स्पर्धाच सुरू आहे. त्यातच यंदाच्या सणांचा मोसम लक्षात घेत सवलतींचा धडाकाही त्यांनी लावला आहे. मात्र अखिल भारतीय व्यापार महासंघाने (सीएआयटी) या साऱ्या व्यवहारांची चौकशीच करण्याची मागणी केंद्रीय व्यापार व वाणिज्यमंत्री निर्मला सितारामन यांना पत्र लिहून केली आहे. संघटना याबाबत भारतीय स्पर्धा आयोगाकडेही धाव घेणार असल्याचे महासंघाच्या अध्यक्ष व सरचिटणीसांनी नमूद केले आहे.
याबाबत महासंघाने पत्रात म्हटले आहे की, ई-कॉमर्सवरील वस्तूंची मालकी ही खऱ्या अर्थाने उत्पादक कंपन्यांची असते. तेव्हा तिच्या किमतीचा अधिकारही त्यांनाच आहे. मात्र स्पर्धेच्या ओझ्याखाली या उत्पादनांच्या किमती मोठय़ा सवलतीने देऊ करतात. नेमका कोणता व्यवसाय आराखडा त्या अवलंबतात, असा सवालही करण्यात आला आहे. अशा कंपन्यांच्या सखोल चौकशीसाठी विशेष दल स्थापन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. आवश्यकता पडल्यास महासंघ भारतीय स्पर्धा आयोगाकडेही धाव घेईल, असेही सांगण्यात आले आहे.
ई-कॉमर्सवर व्यवहार करत कंपन्या मूल्यवर्धित करचुकवेगिरीला वाव देत असल्याचे नमूद करत यामुळे राज्य शासनांचे नुकसान होत असल्याकडेही महासंघाने लक्ष वेधले आहे. एकूणच ई-कॉमर्स व्यवसायासाठी नियामक यंत्रणा स्थापण्याची मागणी या पत्राद्वारे महासंघाने केंद्र सरकारकडे केली आहे.
ई-कॉमर्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे खट्टू पारंपरिक रिटेलसम्राटांनी आपल्या दुराग्रहाला मुरड घातली आहे. आघाडीची अमेरिकी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनबरोबर सहकार्य करण्यास फ्यूचर ग्रुपचे अध्यक्ष किशोर बियाणी आता उत्सुक आहेत. ई-कॉमर्स व्यवसाय फायद्यात कसा असू शकतो, असा सवाल उपस्थित करत बियाणी यांनी या कंपन्यांच्या ढोबळ नफ्याकडेही पाहणे आवश्यक ठरेल, अशी प्रतिक्रिया गेल्याच आठवडय़ात दिली होती. तेच बियाणी येत्या आठवडय़ात आपल्या समूहातील काही उत्पादने अ‍ॅमेझॉनवर विकण्याच्या चर्चेत सहभागी झाले आहेत. ‘बिग बझार’सारखी दालने चालविणारा फ्यूचर समूह खासगी नाममुद्रेने खास करून खाद्य उत्पादनांची विक्री करतो. खाद्य उत्पादन विक्रीत शिरकाव करण्याचा मनोदय अ‍ॅमेझॉननेही व्यक्त केला आहे. तूर्तास आपल्याच संकेतस्थळांमार्फत विक्री करणारा फ्यूचर समूह आता मात्र अन्य ई-कॉमर्स कंपन्यांचेही सहाय्य घेणार आहे. काही दिवसांपूर्वी स्वत:चे संकेतस्थळ विक्री व्यासपीठ उपलब्ध असलेल्या टाटा समूहातील क्रोमानेही स्नॅपडिलबरोबर उत्पादन विक्री सुरू केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा