खुद्द वस्त्रोद्योग आयुक्त गुप्ता यांची कबुली
भारतातील कापड आणि तयार वस्त्रांची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील दृश्यमान असलेली उभारी आणि प्रतिस्पर्धी चीन अर्थव्यवस्थेत मंदावलेपण असतानाही, वस्त्रोद्योगाची एकूण निर्यात ४० अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजे आधीच्या २०१४-१५ सालच्या पातळीवरच राहील, अशी कयासवजा कबुली खुद्द वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. कविता गुप्ता यांनी गुरुवारी येथे बोलताना दिली.
चीनचे मंदावलेपण हे भारताच्या दृष्टीने संधीचे जरूर आहे, तरी वस्त्रोद्योगाची एकूण निर्यात ४० अब्ज डॉलरच्या घरात राहण्याचे आपण अंदाजत आहोत. जगावर मंदीचे सावट असून, प्राप्त परिस्थितीत उद्योगांना सहाय्यभूत अशी शक्य ती सर्व मदत पुरविली जात आहे, असे डॉ. गुप्ता यांनी पत्रकारांशी वार्तालापात स्पष्ट केले. वस्त्रनिर्मात्यांची संघटना- क्लोदिंग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडिया (सीएमएआय)च्या ६२ व्या वार्षिक वस्त्र मेळाव्याच्या उद्घाटनासाठी त्या येथे आल्या होत्या. गोरेगाव पूर्व येथील एनएसई संकुलात हे बीटूबी धाटणीचे प्रदर्शन व परिषद सुरू आहे.
गेली सलग तीन वर्षे भारताची एकूण वस्त्रनिर्यात ही आहे त्याच पातळीवर आहे. २०१४-१५ सालात ती ४१.४ अब्ज डॉलर तर त्या आधी २०१३-१४ मध्ये ३९.३१ अब्ज डॉलर इतकी होती. चीन कमकुवत पडला असला तरी आपला वस्त्रोद्योग बहुतांश निर्यात बाजारपेठ बांगलादेश व व्हिएतनाम या स्पर्धक आशियाई देशांना गमावत असल्याचेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
या सर्व घटकांना लक्षात घेऊन नवीन वस्त्रोद्योग धोरणाचा मसुदा बनविला गेला असून, तो लवकरच चर्चेसाठी खुला केला जाईल, असे त्यांनी सांगितले. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार पुरविणाऱ्या या क्षेत्राच्या अडचणी दूर करण्याबाबत सरकारची संपूर्ण पाठिंब्याची भूमिका असल्याचे डॉ. कविता गुप्ता म्हणाल्या.
देशविदेशातील तयार वस्त्राचे अग्रणी नाममुद्रा एका मंचावर आणणारे हे प्रदर्शन बीटूबी धाटणीचे असून ते तीन दिवस सुरू असेल.