गुंतवणुकीचा घास घेणाऱ्या चलनवाढीला मात देणारा सरस परताव्याचा गुंतवणूक पर्याय शोधणाऱ्यांना वाणिज्य वाहनांसाठी कर्जसाहाय्य देणारी सर्वात मोठी कंपनी ‘श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स कं. लि.’ने अशी एक संधी बहाल केली आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षांतील तिच्या पहिल्यावहिल्या अपरिवर्तनीय कर्जरोख्यांच्या (एनसीडी) विक्रीची बुधवारी घोषणा केली.
येत्या १६ जुलैपासून खुली विक्री सुरू होत असलेल्या या कर्जरोख्यांच्या माध्यमातून श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्सला रु. ७५० कोटींचा निधी उभा राहणे अपेक्षित आहे. ही रोखेविक्री २९ जुलैला संपुष्टात येईल. या कर्जरोख्यांवर बँकांच्या मुदत ठेवी तसेच दीर्घ मुदतीच्या सरकारी रोख्यांपेक्षा सरस ठरेल, असा द.सा.द.शे. ९.६५ ते ११.१५% असा परतावा गुंतवणूकदारांना देऊ करण्यात आला आहे. तथापि गेल्या वर्षी श्रीराम ट्रान्स्पोर्टने आपल्या कर्जरोख्यांवर  वार्षिक ११.४०% असा तुलनेने उमदा परतावा दिला आहे.  या रोखेविक्रीत प्रत्येकी १००० रु. दर्शनी मूल्याच्या १० रोख्यांमध्ये किमान गुंतवणूक (रु. १०,०००) करून सहभागी होता येईल. तीन वर्षे, पाच वर्षे असा वेगवेगळा मुदत काळ आणि परतावा पद्धतीनुरूप या कर्जरोख्यांच्या पाच मालिका व्यक्तिगत गुंतवणूकदारांसाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. आघाडीच्या पतमानांकन संस्था क्रिसिल आणि केअर यांनी या रोखेविक्रीला अनुक्रमे एए/स्थिर आणि एए+ अशी मानांकने बहाल केली आहेत. सध्याचे व्याजदराबाबत अनिश्चिततेचे वातावरण आणि एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेतील मलूलतेमुळे मोठय़ा ट्रक्सच्या यथातथा असलेली विक्री पाहता, श्रीराम ट्रान्सपोर्ट चालू वर्षांत निधीचा स्रोत म्हणून कर्जरोख्यांच्या माध्यमाकडेच आशेने पाहत असून, त्यायोगे वर्षभरात रु. २००० कोटींचा निधी कंपनी उभारू पाहत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा