पर्यावरणपूरक आणि ऊर्जाबचतीच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेला आर्थिक राजधानीतील पहिला पुनर्वसन प्रकल्प उपनगरात साकारला आहे. ‘लीड-इंडिया’ या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून हा प्रकल्प तीन वर्षे, तीन महिने अशा अल्पावधीत उभारण्याचा प्रयत्नही यामाध्यमातून झाला आहे.
भांडुप (पश्चिम) येथील जंगल मंगल मार्ग (साझ सिनेमागृहानजीक) एकूण २४ हजार चौरस फूट जागेत १७ मजली पुनर्वसन इमारत उभारली गेली असून तेथील प्रत्येक मजल्यावरील ६ फ्लॅटमध्ये (प्रत्येकी २६९ चौरस फूट) विद्युत दिवेही ऊर्जेची बचत करणारे आहेत. खिडक्यांनी लावण्यात आलेली तावदानेही महागडय़ा धातूंपासून बनविण्यात आली आहेत. इमारतीचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अस्तित्वात आणलेल्या साहित्याद्वारे करण्यात आले आहे.
पुनर्वसन इमारतीतील ९१ फ्लॅट हे चाळीसारखे समोरासमोर तर नाहीच मात्र दोन फ्लॅटमधील अंतरही कमाल आहे. घराघरांमध्ये येथे पुनर्वसन व विक्रीसाठी तयार करण्याता आलेल्या बांधकामात फरक करण्यात आला नसून केवळ जागेबाबतचा भिन्नता आहे. दोन्ही इमारती शेजारी शेजारी असल्या तरी त्यांचा प्रवेश भिन्न ठेवण्यात आला आहे. पुनर्वसन इमारतीबरोबर एक बालवाडी, एक समाज केंद्र आणि एक सहकारी संस्थेचे कार्यालय आहे. तर विक्रीसाठी असलेल्या इमारतीत २३ मजले आहेत, वाहनतळ आहे. शिवाय वाणिज्यिक वापरासाठीची दालने आहेत.
हा प्रकल्प साकारणाऱ्या ‘वरसिद्धी इन्फ्रास्ट्रक्चर’चे संचालक अमित कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, ऊर्जाबचतीवर भर देताना बांधकामात एरवीच्या २० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च येतो. शिवाय पुनर्वसन प्रकल्प हे वेळखाऊ असतात. मात्र या प्रकल्पाच्या वेळीच साऱ्यांचेच सहकार्य मिळाले. शिवाय वेगळ्या अशा साऱ्या गोष्टी देताना अनोखा आनंद होता. पहिल्या वर्षी इमारतीची देखभाल कंपनी करणार असून घरमालकांकडून ठेव म्हणून घेण्यात आलेली रक्कम दिर्घकाळासाठी सुरक्षित ठेवण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader