घसरत्या महागाईने खरेदीदार सावरले असले तरी कर्जदारांपुढे मात्र वाढीव व्याजदराचे पानच वाढवून ठेवले आहे. महागाई निर्देशांकात अन्नधान्याचा दर गेल्या महिन्यांत कमी झाला असतानाच घर, वाहन आदी भौतिक वस्तूंसाठी अधिक मासिक हप्ते भरावे लागणार आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी मंगळवारच्या तिमाही पतधोरणात रेपो दर पाव टक्क्याने वाढवून तो थेट ८ टक्क्यांवर नेऊन ठेवला. यामुळे गृहकर्जे महाग होण्याची चिन्हे आहेत.
पहिल्या पतधोरणापासून तमाम अर्थजगताला आश्चर्याचे धक्के देणाऱ्या राजन यांनी यंदा डिसेंबरमध्ये किरकोळ तसेच घाऊक महागाई दर कमी होऊनही रेपो दरात वाढ केली. चालू आर्थिक वर्षअखेरपर्यंत महागाईचा दर ८ टक्क्यांच्या खाली येणारच नाही, अशी भविष्यवाणी वर्तवित त्यांनी वाढीव व्याजदराचे समर्थन केले. याचबरोबर देशाचा विद्यमान विकासदरही ५ टक्क्यांच्या खाली खेचला आहे.
एकूणच या पतधोरणानंतर बँकांनीही तूर्त नाही मात्र नजीकच्या कालावधीत खर्चावर अंकुश ठेवण्यासाठी गृह आदी व्याजदर वाढविले जातील, असेच संकेत दिले. महागाई वाढत असेल तर ठेवींवरही अधिक व्याज देणे परवडणार नाही, असेही बँका म्हणतात. महागाईबरोबरच ठेवींचा ओघ आगामी कालावधीत कसा राहील, यावरच व्याजदर वाढविण्याचे पाऊल उचलले जाईल, असे प्रमुख बँकांनी म्हटले आहे. व्यापारी बँकांचे गृह कर्ज तूर्त वार्षिक १० टक्क्यांच्या पुढेच आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या यापूर्वीच्या स्थिर व्याजदर धोरणानंतर स्टेट बँकेसह निवडक बँकांनी मर्यादित कालावधीतील व्याजदरातील सूट योजना जाहीर केली होती. संथ विकास दराच्या प्रवासाचे साक्षीदार असणाऱ्या भारतातील उद्योग क्षेत्राने मात्र रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. व्याजदर सवलतीची खरी अपेक्षा आताच होती, असे आघाडीच्या उद्योग संघटनांनी म्हटले आहे.
या पतधोरणाचे सावट मंगळवारी अपेक्षेप्रमाणे भांडवली बाजारातही उमटले. व्याजदराशी निगडित कंपनी समभागांचे मूल्य दिवसअखेर रोडावत सेन्सेक्सने व्यवहारात २०,६०० चा तळही गाठला. उलट डॉलरच्या तुलनेत रुपया मात्र व्यवहारअखेर ६३ च्या खाली येत अधिक भक्कम बनला.

Story img Loader